लेखिका - डॉ. ऐश्वर्या रेवडकर
वैद्यकीय शिक्षण घेतांना रुग्णसेवा करतांना तळागाळातील असहाय माणसांच्या वेदनेनं ग्रामीण भागातील स्रियांसाठी काम करायचं या निश्चयाने स्रीरोगतज्ञ म्हणून डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग यांच्यासोबत सर्च या संस्थेत काम केलं. उत्तराखंडमधील कुमाऊ पहाडीतील आरोही या संस्थेसोबत काम करतांना पहाडी स्त्रियांच्या आरोग्य समस्या, आरोग्य सुविधांचा अभाव, घरी प्रसूती होतानाची मृत्यू या अनुभवांनी व्यथित होऊन छत्तीसगढ राज्यातील बिजापूर जिल्हा रुग्णालयात स्रीरोगतज्ञ म्हणून नौकरी स्विकारली. या नक्षलग्रस्त प्रदेशात नौकरी सहसा टाळली जाते. तिथे माझी गरज आहे या प्रबळ भावना लेखिकेला त्या भागात घेऊन गेली. तिथे जे अनुभव आले त्याचं प्रतिबिंब म्हणजे ही बिजापूर डायरी.
जिल्हा रुग्णालयात तिथले कलेक्टर अय्याज तांबोळी ह्यांच्या कार्यकाळात बऱ्याच सुधारणा झाल्या होत्या. गुंतागुंतीची प्रसुती किंवा शस्ञक्रियेसाठी १६४ किमी दूर जगदलपूरला जावं लागायचं त्या सगळ्या सुविधा बिजापूरला उपलब्ध करून दिल्या. खरं तर त्यांच्या सांगण्यावरुनच लेखिकेने ही नौकरी स्विकारली होती.
त्या भागातील सगळ्या लोकांमध्ये विषेशतः स्रियामध्ये आरोग्याची काळजी बाबत प्रचंड उदासिनता होती. वयाची तिशी येता येताच आठ दहा बाळांतपणं होऊन जायची. घरच्या घरी. जास्त काही झालं तरच दवाखाना गाठायचा. त्यामुळे अशा अत्यावस्थ रुग्णावर उपचार करतांना कसौटी लागायची.
रुग्णांनाही येणं सोपं नसायचं, धड रस्ते नाही. वाहन नाही. भरभरून वाहणारे नद्या नाले आडवे यायचे. त्यासाठी गाव पाड्यात शिबिरे घेतली जाऊ लागली. त्यातून आरोग्याचे महत्त्व समजावून सांगितले जायचे.
आपल्या वैद्यकीय अनुभवासह लेखिकेने तिथले जनजीवन चालीरीती, परंपरा, नक्षलवाद, ह्याचेही अनुभव सांगितले आहेत. २००५ सालच्या सलवा जुडूम या शांती अभियानाने खवळून नक्षलवाद्यांनी केलेलं हत्या सत्र. काही गावे नक्षली प्रभावाने इतकी संवेदनशील आहेत की गावाबाहेर जाण्यासाठी किंवा गावात येण्यासाठी नक्षल पुढाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते.
अशा वातावरणातही काही ध्येयासक्त व्यक्तिमत्वांची ओळख होते. समाजासाठी काम करायचं या तळमळीने साॅफ्टवेअर इंजिनिअर असलेला मकरंद दिक्षित परदेशातली नौकरी सोडून दुष्काळी खेड्यात जलसंधारणाची कामे करीत खाजगी देणग्यातून रोजगार हमी योजना राबवणारा, त्याचसोबत गावातील रहीवासी शाळेतील मुलांना हस्तकला शिकवणे स्वच्छता, आरोग्य अशा वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधन करायचा.
दंतेवाडा जिल्ह्यातील बारसू येथे वनवासी कल्याण आश्रम चालवणारे गोडबोले दांपत्य. त्यानीही स्वतःला रुग्णसेवेला वाहून घेतलेलं.
मकरंद दिक्षित व डॉ. गोडबोले ह्यांना कलेक्टर ऐय्याज तांबोळींनी सर्व प्रकारचे सहाय्य दिले. उच्च स्तरीय अधिकारी समाजाप्रती तळमळ बाळगणारा असला तर सकारात्मक बदल घडतात.
आंध्र प्रदेशातला प्रणित सिन्हा. डॉ गोडबोलेंच्या संपर्कात आला आणि त्याने मुलांसाठी बचपन बचाओ ही संस्था उभी केली. शिक्षणाला रुढ चौकटीच्या बाहेर काढून आदिवासी जीवनाशी सुसंगत बनवण्याचे प्रयत्न करतोय.
बिजापूर स्पोर्ट्स अकादमीतला भुवन नागे, मुलांना ज्युडो कराटे शिकवायचा. सरकारी निधी यायला उशीर झाला म्हणून मुलांच्या आहारावर, कपड्यावर स्वतः खर्च करणारा. त्याचे विद्यार्थी राष्ट्रपातळीवर चमकले होते.
अशी वेगवेगळी झपाटलेली माणसं स्तिमित करतात.
डॉ ऐश्वर्या रेवडकरांची ही बिजापूर डायरी त्यांच्या वैद्यकीय घटनांसोबत नक्षलग्रस्त आदिवासींचे ओढग्रस्तीचं, भितिच्या सावटाखाली असलेल्या जगण्यासोबतच हे जगणं सुसह्य करणाऱ्या जगावेगळ्या व्यक्तिमत्वांची ओळख करून देतात.