रोश विरुध्द स्टॅनले ॲडॅम्स

पुस्तकाचे नाव -  रोश विरुद्ध स्टॅनले ॲडॅम्स
लेखक - स्टॅनले ॲडॅम्स
अनुवाद - डॉ. सदानंद बोरसे



सिर्फ एक सॅरिडॉन और सरदर्द से आराम

जाहिरातीत उल्लेखलेली ‘सॅरिडॉन’ ही गोळी वेदनाशामक म्हणून विलक्षण लोकप्रिय होती. मुख्य म्हणजे डॉक्टरी चिठ्ठीविना ‘ओव्हर द काउंटर’ या प्रकारे ही गोळी सामान्य माणूस थेट औषध-दुकानदाराकडून घेऊ शकत असे. कित्येकदा औषध दुकानांऐवजी अन्य जनरल स्टोअर, किराणामालाचे दुकान अशा ठिकाणीही ही गोळी उपलब्ध असे.

‘सॅरिडॉन’ या गोळीची निर्माती होती स्वित्झर्लंडमधील एक महाबलाढय बहुराष्ट्रीय कंपनी ‘ हाफमान-ला-रोश ’. सॅरिडॉन या रोशच्या एका उत्पादनाचा खपसुध्दा इतर कित्येक छोटया औषध-कंपन्यांच्या एकूण उलाढालीपेक्षा कित्येक पटींनी जास्त असेल आणि सुमारे पाच दशकांपूर्वीच स्वित्झर्लंडमधल्या या कंपनीचे हे उत्पादन भारतासारख्या देशात खेडोपाडी अन् गल्लोगल्ली सहज उपलब्ध होते.

रोशचे प्रमुख केंद्र होते स्वित्झर्लंडमधील बेस्ले या ठिकाणी असले तरी ही कंपनी जगभर पसरलेली होती. स्वित्झर्लंड हे तसे छोटे राष्ट्र. त्या राष्ट्राच्या तर सरकारपासून, प्रशासनापासून सामान्य नागरिकापर्यंत साऱ्यांचेच हितसंबंध काही मोजक्या कंपन्यांच्या व्यवहारात आणि अर्थकारणात गुंतलेले. दैनंदिन छोटया छोटया गोष्टींपासून अगदी अस्तित्वाशीच निगडित अनेक बाबींपर्यंत अनेक ठिकाणी या कंपन्या, त्यांची धोरणे आपला प्रभाव टाकणार. रोश ही अशा कंपन्यांपैकी एक महत्त्वाची कंपनी.

सगळ्या गोष्टी वरवर पाहता सुरळीत, चाललेल्या वाटल्या; तरी एखाद्याची सदसद्विवेकबुध्दी या पृष्ठभागाखालची खदखद आणि अन्याय पाहून अस्वस्थ व्हायला लागते. ‘मला काय त्याचे?’ अशा बेफिकीर बेहोशीतून जागी होऊ लागते. सभोवतालच्या स्वत:ला सुखावणाऱ्या पण बाकीच्यांना जखडणाऱ्या व्यवस्थेविरोधात बंडखोरी करू लागते. रोशमध्ये उच्च पदावर काम करणाऱ्या एका माणसाचा विवेक त्याला अशीच टोचणी देऊ लागला. त्या माणसाचे नाव स्टॅनले ॲडॅम्स. रोशच्या आर्थिक धोरणांमधली फक्त नफेखोरीसाठीच आसुसलेली बेपर्वाई, विकसनशील देशांबद्दलचा कंपनीचा बेफिकीर दृष्टिकोन, स्वत:ची मक्तेदारी येन केन प्रकारेण टिकवून ठेवण्याची मतलबी स्वार्थी वृत्ती, नफेखोरी या साऱ्यांविरुध्द स्टॅनले ॲडॅम्सनी आवाज उठवला.

ॲडॅम्सने जेव्हा कंपनीचे गैरव्यवहार युरोपियन स्पर्धा आयोगाच्या ( इ इ सी) तपास अधिकाऱ्यांना दिल्यावर कंपनीवर धाड पडून तपासणी झाली. मात्र काही दिवसातच  कंपनीचे औषधांचे फाॅर्म्युले चोरून विकल्या बद्दल ॲडॅम्सला अटक करण्यात आली. तो तुरुंगात असतांना पोलिसांनी त्याच्या पत्नीला तपासाच्या नावाखाली इतका त्रास दिला की, शेवटी असह्य होऊन तिने आत्महत्या केली. तिच्या अंत्यविधीसाठी हजर राहण्याची ॲडॅम्सचा विनंती अर्ज नाकारला गेला. अटकेची बातमी इ इ सी च्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यावर अखेर तीन महिन्यांनी ॲडॅम्स जामीनावर बाहेर पडला. 

जिनेव्हातील रोश च्या एका कारखान्यात स्फेट होऊन विषबाधेने परिसरातील अनेक पशु पक्ष्यासंह मोठी प्राणहानी झाली. तेव्हा रोश कंपनीने नुकसान भरपाई देऊ केली ती लोकांनी नाकारली. प्रकरण दडपण्यासाठी लाच असे म्हटले गेले. तेव्हा एका वृत्तपत्राच्या संपादकाने ॲडॅम्सची मुलाखत घेतली. लगेच त्याला नौकरीला मुकावे लागले. 

कंपनीने ॲडॅम्सला वेगवेगळ्या कायद्याच्या जंजाळात अडकवले. अनेक देशांतील सरकारांमध्ये रोशचे वर्चस्व होते.    स्वित्झर्लंड सरकार तर रोशच्या इशाऱ्यानुसार पावले टाकीत होतं म्हणून फक्त स्वित्झर्लंडमधेच नाही तर ब्रिटन, इटलीतही त्याला जगणं असह्य केलं. अगदी कफल्लक केलं.  युरोपियन युनियनच्या काही अधिकाऱ्यांनी सुरूवातीला मदत केली नंतर मात्र काढता पाय घेतला. एरिक डायफेनबाकर या वकीलांनी हा खटला युरोपियन युनियन व आंतरराष्ट्रीय मानवी हक्क न्यायालयात उभा केल्यावर  काही वकील व जनसामान्यांनी चालवलेल्या पाठिंब्याच्या मोहिमेमुळे शेवटी रोशला माघार घ्यावी लागली. ही माघार तात्पुरती आहे. 

ॲडॅम्स रोशवर नुकसानभरपाई चा दावा दाखल करणार आहे. त्यानंतर काय होईल, कोणालाही कल्पना नाही. 

ॲडॅम्स म्हणतो, " गुढगे टेकणाऱ्या लाचार जिण्यापेक्षा मान ताठ ठेवणारा मृत्यू लाख पटींनी चांगला. "

‘रोश विरुध्द ॲडॅम्स’ ही या झुंजीची खरीखुरी कहाणी. अनेक अनुत्तरित प्रश्न निर्माण करणारी. व्यवस्थेच्या विळख्याविरोधात उभ्या ठाकणाऱ्या व्यक्तीची घुसमट, तडफड जिवंत करणारी. तुम्ही-आम्हीही या विळख्यातच जगतो आहोत, ही अस्वस्थ जाणीव करून देणारी. ही सारी कहाणी स्टॅनले ॲडॅम्स यांनी ‘रोश व्हर्सेस ॲडॅम्स’ या पुस्तकातून मांडली; तेव्हा हे पुस्तक फारसे कुणापर्यंत पोहोचू नये, असेही जाणीवपूर्वक प्रयत्न झाले. जर्मन, डॅनिश, स्वीडिश, नॉर्वेजिअन, जपानी आणि रशियन भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. मात्र अमेरिकेतील कोणाही प्रकाशकाने अमेरिकेतून हे पुस्तक प्रसिध्द करण्यास मान्यता दिली नाही.

या पुस्तकातील घटना १९७० ते १९८५ या कालावधीतील आहेत. 

सध्या स्टॅनले ॲडॅम्स स्कॉटलंड मधील सेंट ऍंड्र्युज विद्यापीठाचे प्रमुख आहेत. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.