लेखक एलिस्टर मॅक्लिन
अनुवाद - अशोक पाध्ये
एलिस्टर मॅक्लिन च्या गुप्तहेर कथा साधारणपणे दुसऱ्या यहायुध्दाच्या व त्या नंतरच्या शीतयुद्धाच्या कालखंडातील आहेत. दुसऱ्या महायुद्धात ते स्वतः नौदलात असल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष युध्दात भाग घेतला असल्यामुळे कादंबरी काल्पनिक असली तरीही जीवंत वाटते.
ही कादंबरी दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळातील शीतयुद्धात कम्युनिस्ट राजवटीतील अत्याचाराची, कट कारस्थानाची कहाणी सांगणारी आहे.
क्षेपणास्त्र तज्ञ असलेले एका ब्रिटिश शास्रज्ञ जेनिंग्स चे रशियाने अपहरण करून हंगेरी मध्ये एका परिषदेसाठी आणले असून त्याने कोणतीही गडबड करू नये म्हणून त्याच्या पत्नीला व मुलाला वेठीस धरले आहे. ब्रिटिशांनी एक गुप्तहेर रेनाॅल्डला त्या शास्रज्ञाला सोडविण्यासाठी हंगेरीला पाठवले. तिथल्या सरकार विरोधी संघटना त्याला मदत करणार होती. त्या संघटनेचा प्रमुख जांस्कीने एके काळी कम्युनिस्टांचा प्रचंड छळ सहन केला होता. अनेक वर्षांपूर्वी एव्हीओ या सरकारी गुप्तचर संस्थेने त्याच्या पत्नीला ताब्यात घेऊन त्याचा ठावठिकाणा शोधण्यासाठी तिचा छळ केला होता. त्याच्यासोबत आता त्याची मुलगी ज्युलिया होती. एव्हीओचा एक अधिकारी काऊंट त्याला सामील होता. त्यांच्या मदतीने रेनाॅल्डने जेनिंग्स ला कुठे आहे हे शोधून काढले. आपली पत्नी व मुलगा सुरक्षित असेल तरच जेनिंग्स परत येणार होता.
रेनाॅल्डने पुर्ण खबरदारी घेऊनही त्याच्या आणि जेनिंग्स च्या भेटीत जे काही बोलणे झाले ते एव्हीओला समजले होते. त्यांनी लगेच जेनिंग्स ला दुसरीकडे हलवले. रेनाॅल्डला एव्हीओने ओळखले होते. त्याला पकडण्यासाठी नाकेबंदी केली गेली. आपल्यावर सोपवलेली कामगिरी आता कदाचित पुरी होऊ शकणार नाही असं त्याला वाटू लागले. तरीही तो सगळे प्रयत्न करणार होता. जांस्कीने त्याला सगळ्या प्रकारच्या मदतीचे आश्वासन दिले होते.
आता सुरू होतो एक विषम पातळीवरचा संघर्ष. राष्ट्रीय पातळीवर पसरलेली एक निर्दय सरकारी संघटना, जिच्याकडे परिपूर्ण यंत्रणा आहे, आणि रेनाॅल्डला मदत करणारे जांस्की, काऊंट कडे अत्यंत तोकडी सामग्री आणि मोजके मदतनीस आहे.
ऍलिस्टर मॅक्लीन यांच्या कादंबऱ्यांमधले नायक पराक्रमाचं अंतिम टोक तर गाठतातच, शिवाय रहस्यपुर्ण उत्कंठावर्धक कथानकात मिळणाऱ्या कलाटण्या वाचकाला जखडून ठेवतात.
कथानकाच्या ओघात तत्कालीन राजकीय परिस्थितीचे विवेचन करीत कम्युनिस्ट राजवटीत जनतेला कशा यातना सहन कराव्या लागतात, त्यासाठी लोकशाही प्रबळ व्हायला हवी अशी चर्चा केली आहे. त्याचसोबत या तणावपूर्ण परिस्थितीत रेनाॅल्ड आणि ज्युलियाची फुलत जाणारी प्रेमकथा भुरळ पाडते. काही वेळा मात्र कथानक संथावल्यासारखे वाटते.
ऍलिस्टर मॅक्लीन ह्यांच्या कादंबऱ्यातले कथानक सर्वसाधारणपणे एक दोन दिवसात घडते. मात्र या कादंबरीत कथानकाचा कालावधी एक आठवड्याचा आहे.