लेखिका - आश्विनी कुलकर्णी
बाजीराव पेशव्याचा उल्लेख येताच ताबडतोब आठवते ती मस्तानी. काशीबाईंची आठवण करून द्यावी लागते.
मराठेशाहीच्या इतिहासात आपले स्वतंत्र अस्तित्व दाखवणाऱ्या अनेक कर्तबगार स्रीया होऊन गेल्या.
पहिल्या बाजीरावा पेशवा सारखा रणधुरंदर ज्याचं बहुतांश आयुष्य रणांगणावर गेलं, त्याची पत्नी श्रीमंत पेशवीण काशीबाई त्यापैकी एक. प्रेमळ, हळव्या स्वभावाची पेशवे घराण्यातील ही थोरली सुन.
लग्नानंतर लवकरच बाजीरावांना पेशवेपद मिळाल्यावर सतत चालणाऱ्या मोहींमांमुळे पती पत्नी च्या जवळकीचे क्षण कमी होते. त्या कमतरतेतही काशीबाईंनी बाजीरावांवर प्रेमाची उधळण केली. आपल्यामुळे राऊला कोणताही त्रास होऊ नये याची खबरदारी घेतली. काशीबाई अत्यंत धार्मिक, देवभोळ्या, शकून अपशकूनावर विश्वास ठेवणाऱ्या तर बाजीराव ह्याच्या अगदी विरुद्ध स्वभावाचे, तलवारीच्या जोरावर विश्वास ठेवणारे. बाजीरावांनीही काशीबाईचा सन्मान केला.
त्यांच्या आयुष्यात मस्तानी आल्यावरही काशीबाईंवरचे त्याचे प्रेम कणभरही कमी झाले नाही. पर्वतीचा जिर्णोद्धार करतांना काशीबाईंचा पाय दुखतो म्हणून पायऱ्या लहान ठेवायला सांगितल्या. मोहीमेवर असतांनाही वेगवेगळ्या प्रदेशातील हकीमांकडून पायदुखीवर औषध मागायचे.
काशीबाईंनी कधीही कोणाचाही दुस्वास केला नाही. मस्तानीचाही नाही. सुरुवातीला उलटसुलट विचारांचे भावभावनांचे कल्लोळ निर्माण झाले खरे पण लवकरच त्या सावरल्या. मस्तानीच्या वडीलांच्या निधनानंतर कोथरूडच्या वाड्यात जाऊन मस्तानीचे सांत्वन केले. बाजीराव वारंवार तिकडे जातात, याचा लोकांना चघळायला विषय नको म्हणून मस्तानीला शनिवार वाड्यात एक दालन दिले. बाजीरावाला मस्तानी पासून झालेल्या मुलाला माया दिली. नानासाहेबांनी मस्तानीला कैदेत ठेवलं हे समजल्यावर त्यानी जाब विचारला होता.
अनेक तत्कालीन घडामोडींचा परामर्श घेत पेशवाईच्या या कालखंडाचा अत्यंत ओघवता इतिहास चितारला आहे. बाजीराव, काशीबाई, मस्तानीसह अनेक व्यक्तीरेखांचा हा प्रवास तो विवक्षित कालखंड वाचकाच्या नजरेसमोर उभा राहतो. बाजीरावांच्या मोहीमांचेही डावपेचात्मक विस्तृत वर्णन करतांना चिमाजीआप्पाचा किंवा सहकारी सरदांरांचा पराक्रम ही झाकोळला जात नाही हे विषेश. बाजीराव, मस्तानी, कशीबाईंची अखेर मात्र मन पिळवटून टाकते.
अशी ही पेशव्यांची थोरली सुन जी पेशवीण असुनही एक सरळ साधे घरा दाराला जोडून ठेवणारे, आपले दु:ख मनात ठेवून हसत राहणारी श्रीमंत पेशवीण काशीबाई.