द ब्रोकर

पुस्तकाचे नाव -  द ब्रोकर
लेखक - जाॅन ग्रिशॅम
अनुवाद - अशोक पाध्ये



भारताने अंतराळात सोडलेल्या उपग्रहाची हेरगिरी करतांना       तीन पाकिस्तानी शास्रज्ञांना अवचितपणे काही उपग्रहाची मालिका सापडली ज्याची मालकी कोणत्या देशाची आहे हे समजत नव्हते. अमेरिका सुध्दा या बाबतीत अनभिज्ञ होती. पाकिस्तानी शास्रज्ञांनी त्या उपग्रहाच्या संगणक प्रणालीमध्ये हस्तक्षेप करून उपग्रह स्वता:च्या देखरेखीखाली आणले. 

आता ही संगणक प्रणाली विकून पाकीस्तानी शास्रज्ञ पैसा कमवू शकणार होते आणि असा अवाढव्य व्यवहार करणारा एकच दलाल होता, जोएल बॅकमन. 

बॅकमनची वरीष्ठ सत्ता वर्तुळात उठबस होती. सत्ताकारणात कोणाला खाली खेचायचे, कोणाला वर चढवायचे या खेळात भाग घेणारा, सरकारदरबारी अडलेली कामे पैसे घेऊन करून देणारा एक दलाल. आपल्या क्लाएंट साठी सरकारी धोरण ठरवण्याची किंवा ठरलेली धोरणं बदलण्याची त्याची क्षमता होती. हे करतांना त्याने अनेक कायदे मोडले होते. त्यामुळे आणि उपग्रह संगणक प्रणाली खरेदी विक्री प्रकरणामुळे सी आय ए ची नजर जोएल बॅकमन कडे वळली. वेगवेगळ्या अनेक आरोपावरून बॅकमन ला अटक करण्यात आली. त्याच्यावर खटला दाखल करण्यात आला. अशातच बॅकमन चा भागीदारचा खुन झाला. प्रथमदर्शनी ती आत्महत्या वाटत असली तरी ती हत्या असल्याचे सिद्ध झाल्याने बॅकमनने काही आरोप मान्य केले. त्याला एकवीस वर्षांची शिक्षा सुनावली गेली. बाहेर राहण्यापेक्षा जेल मध्ये असणं त्याला जास्त सुरक्षित वाटत होतं. त्या दरम्यान त्या तीन पाकिस्तानी शास्रज्ञांचीही हत्या झाली. आता उपग्रह आणि उपग्रह ताब्यात ठेवणाऱ्या संगणक प्रणालीची माहिती असणारा एकटा बॅकमन होता. 

सहा वर्षांनी निवडणूक पराभूत झाल्यानंतर पदभार सोडतांना सी आय ए च्या योजनेवरून राष्ट्राध्यक्षांनी बॅकमनला संपूर्ण माफी देऊन त्याची मुक्तता केली. हे बॅकमनसाठी अनपेक्षित होते. 

सी आय ए ने त्याला आपल्या योजनेनुसार नवीन ओळख, नवीन नाव देऊन इटलीमध्ये ठेवले. तो आपल्या नवीन आयुष्यात स्थिरस्थावर झाल्यावर सी आय ए त्याच्याबद्दलची माहिती इतर देशांच्या गुप्तचर संस्थांना देणार होती. मग इस्रायली, चिनी, सौदी, किंवा इतर देश त्याच्या मागे लागणार होते. बॅकमनच्या जगण्या मरण्यात सी आय ए ला स्वारस्य नव्हते. त्यांना माहीती हवी होती त्या उपग्रहांची आणि संगणक प्रणालीची.  

आणि अचानक एक दिवस चोविसतास सी आय ए च्या नजरकैदेत असलेला बॅकमन बेपत्ता झाला. त्याने सी आय ए ला चकवा दिला होता. 

अत्यंत  थरारक व उत्कंठावर्धक कथानकात अगदी अकल्पित मिळणाऱ्या कलाटण्या वाचकाला धक्का देत गुंगवुन ठेवतात. तर पानोपानी  गडद होणारे रहस्य आणि सी आय ए सारख्या संस्थेशी बॅकमनची एकाकी झुंज स्तिमित करते. 

अशोक पाध्ये यांनी केलेला अनुवाद नेहमीप्रमाणेच प्रशंसनीय. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.