पुस्तकाचे नाव - दुर्योधन
लेखक - काका विधाते
पहिली आवृत्ती सन १९९४ मध्ये प्रसिद्ध झाली होती. नंतर २०१३ साली विस्तारीत पुनर्लेखन केले. अगोदर चारशे पानी असलेली ही कादंबरी एक हजारहून अधिक पानांची झाली.
महाभारताविषयी शतकानुशतके समाजमनाची एक सर्वसाधारण धारणा आहे. ती ही, की ही कौरवपांडवांची कथा असून पांडव न्यायी, धर्मनिष्ठ होते आणि कौरव अन्यायी, दुष्ट होते म्हणून धर्मनिष्ठ पांडवांचा विजय झाला आणि अधर्मी कौरवांचा पराजय झाला. महाभारताचे सारच मुळी 'जिकडे धर्म तिकडे जय' असे आहे.
दुर्योधन महाभारताचा खलनायक असून युद्ध केवळ त्याच्या दुराग्रहामुळे झाले, हाही एक सर्वमान्य समज. तसा तो व्हावा यात नवल काही नाही. महाभारतात ही भूमिका अनेक ठिकाणी आलेली आहे. तरीही ते वाचताना काही प्रश्न पडतात. पांडव सर्वच दृष्टीने थोर, न्यायी, धर्मनिष्ठ असतीलही. पण मग कौरवांचीही काही बाजू, पक्ष आहे की नाही? महाभारताचा विचार नुसत्या धार्मिक वा नैतिक दृष्टीने न करता राजकीय दृष्टीने केल्यास चित्र कसं दिसेल? इतिहास लिहिताना जेत्यांना नेहमीच झुकतं माप मिळत असलं, तरी जितांचीही काही बाजू असते. ती कोणती? त्यांची मनोभूमिका काय असेल? युद्धाला एकटा दुर्योधनच जबाबदार होता काय? या निर्णयाला तो का आला? पांडवांची राज्याची मागणी न्याय होती का? तत्कालीन राजनीतीचा विचार करता राज्यावर त्यांचा हक्क तरी पोहचत होता काय? असं असेल तर मग राजमंडळाची संपूर्ण साथ त्यांना का मिळाली नाही? केवळ सात अक्षौहिणी सैन्यच ते का जमवू शकले? दुर्योधन अन्यायी होता, तर मग अकरा अक्षौहिणी सैन्य आणि अनेक प्रतिष्ठित राजे त्याच्या बाजूला का आले? उठसूठ धर्माचा घोष करणाऱ्या पांडवांनी धर्मयुद्धाचे ठरलेले नियम तरी पाळले का? महाभारताच्या पानापानावर त्यांच्या पराक्रमांच्या कथा पसरलेल्या असताना कौरवांकडील प्रमुख वीरांची हत्या करायची वेळ त्यांच्यावर का आली? कृष्ण यादवांचा नेता होता. तरीही सात्यकी आणि त्याच्या पुत्रांशिवाय एकही यादव वीरच नव्हे, साधा सैनिकसुद्धा त्याला साथ देण्यासाठी का तयार झाला नाही? यादवांची नारायणी सेना दुर्योधनाच्या पक्षाला का गेली?
या प्रश्नांचा नीट विचार केला आणि महाभारतातल्या सर्व व्यक्तिरेखांचा अद्भुतपणा, त्यांच्या भोवती दाटलेलं दैवी वलय दूर केलं, तर एक वेगळंच महाभारत उलगडू लागतं. कौरव - पांडवांच्या संघर्षाचं मूळ धार्मिक वा नैतिक नाही, ते राजकीय आहे. न्याय वा धर्माची चाड होती म्हणून हे युद्ध झालेलं नाही. केवळ राज्याधिकार मिळवण्यासाठी ते झालेलं आहे.
व्यासांनी ८००० ते ८८०० श्लोकांचा 'जय' नावाचा इतिहास लिहिला. इथे सांगणारा संजय आणि ऐकणारा राजा धृतराष्ट्र आहे. व्यास समकालीन, शिवाय कौरवपांडवांचे प्रपितामह. त्यामुळे त्यांच्या लेखनाला ऐतिहासिक मूल्य होतं. व्यासांचा शिष्य वैशंपायनाने या जयचे 'भारत' केले, ज्यात २४००० श्लोक होते. राजा जनमेजयाने सर्पसत्र यज्ञ सुरू केल्यावर त्याच्या विनंतीवरून वैशंपायन ऋषी त्याला त्याच्या पूर्वजांची कथा सांगतात. इथे वक्ता वैशंपायन आणि श्रोता जनमेजय आहे. जनमेजय हा परिक्षिताचा पुत्र. परिक्षित अभिमन्यूचा आणि अभिमन्यू अर्जुनाचा पुत्र. म्हणजे अर्जुन हा जनमेजयाचा पणजा आणि अभिमन्यू त्याचा आजा. त्यामुळे साहजिकच अभिमन्यू आणि अर्जुनाला नायक करण्याच्या दृष्टीने भारत सांगितले गेले का...?
व्यासांनी लिहिलेला मूळ जय इतिहास वा वैशंपायनाने सांगितलेले भारत आज आपल्यापुढे नाही. वैशंपायन हा व्यासांचा शिष्य असला, तरी जनमेजयाला त्याच्या पूर्वजांची कथा सांगताना मूळ कथेत त्याने तिप्पट भर घातली. अर्जुन आणि अभिमन्यूच्या अद्भुत पराक्रमाची जी भारंभार वर्णने महाभारतात दिसतात ती यामुळे. जो अर्जुन विराटाच्या गोग्रहण प्रसंगी सर्व कौरव वीरांचा एकट्याने पराभव करतो,
पण युध्द सुरू होण्याअगोदर क्लैब्य का येते, शिखंडीच्या आडून भिष्म पितामहांवर शरसंधान करावे लागले. द्रोणाचार्यांना मारण्यासाठी अश्वथामा मेल्याची अफवा पसरवली. जमीनीत रुतलेल्या रथाचे चाक काढणाऱ्या निशस्त्र कर्णाचा बळी घेतला. नियम गुंडाळून त्यांच्या हत्या कराव्या लागल्या. सतराव्या दिवशी कर्णाशी युद्ध करायला निघाल्यावर त्याचे काळीज आक्रसून त्याला दरदरून घाम फुटला होता असे वर्णन आहे. यावरून अर्जुनाच्या आणि अभिमन्यूच्या पराक्रमाच्या कथा वैशंपायनाने जनमेजयाला वाढवून चढवून सांगितल्या आहेत अशी शक्यता वाटते.
पुढे उग्रश्रवा सौती या पुराणिकाने भारताची कथा शौनक आणि इतर ऋषींना सांगताना १,००,००० श्लोकांचे 'महाभारत' केले. सौतीचा काळ वेगळा होता. भारतीय युद्धात क्षत्रियांचा अतोनात नाश होऊन पुरोहित वर्गाचे वर्चस्व वाढले. गृहस्थधर्म आणि यज्ञधर्म लोकांना झेपेना. समाज विस्कळीत झाला. अनेकांचे प्रपंच उध्वस्त झाले. त्यामुळे अरण्यवास, वैराग्य यांना अतोनात महत्त्व प्राप्त झाले. वानप्रस्थ आणि संन्यास लोकांना बरा वाटू लागला. प्रवृत्तीपेक्षा लोकांचा कल निवृत्तीकडे झुकला. अहिंसेचा तत्त्व म्हणून उदोउदो सुरू झाला. सौती ही सारी परिस्थिती पाहत होता. समाजाचे, धर्माचे, तत्त्वज्ञानाचे बदलेले स्वरूप त्याला ग्रंथित करायचे होते. पण त्यासाठी एखादा नवा ग्रंथ न लिहिता अनेक कथा, उपकथा, आख्याने, उपाख्याने यांच्या माध्यमातून त्याने हा सारा पसारा वैशंपायनाच्या भारतात समाविष्ट केला आणि त्याचे महाभारत केले - जे आज आपल्यासमोर आहे. त्यामुळे ते जसेच्या तसे स्वीकारण्यापेक्षा त्याची चिकित्सा केली पाहिजे. नीती-अनीती, धर्म-अधर्म, सत्-असत् यांचा पसारा दूर करून चमत्कार, अद्भुतता यांचं दाटलेलं मळभ हटवलं तरच निखळ माणसं म्हणून महाभारतातल्या व्यक्तिरेखांचा विचार करता येईल.
महाभारतकालीन धार्मिक, राजकीय, सामाजिक आणि भौगोलिक परिस्थितीची माहिती देणारे विस्तृत परिशिष्ट कादंबरीच्या शेवटी दिलेले आहे. तसेच तत्कालीन भारत वर्षाचा नकाशा दिला आहे. शिवाय शंभर कौरवांची नावे ही जास्तीची माहिती कादंबरी वाचताना उपयुक्त ठरते.