आण्णाभाऊ साठे

आण्णाभाऊ साठे : 
(१ ऑगस्ट १९२० – १८ जुलै १९६९ ).




 तुकाराम भाऊराव साठे हे पुर्ण नाव.कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवास वर्णन अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारांतील लेखन केलेले, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर, ख्यातनाम मराठी साहित्यिक. गोर-गरीब शेतकरी, शेतमजूर, श्रमिक, दलित, पददलितांचा व्यथा-वेदना कथा कादंबऱ्यांमधून प्रकर्षाने उमटाव्यात त्यांची अशी धारणा होती. अण्णाभाऊंच साहित्य देशाबाहेर अगदी पोलंड, रशियातही लोकप्रिय झालं. जनमानसात प्रसिद्ध पावलं अण्णाभाऊंच्या मते ग्रामीण जीवन टिकाऊ काया आहे, तर शहरी जीवन  दिलखुलास आहे. महात्मा फुले, शाहू महाराज, आगरकर, लोकहितवादी, महर्षी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजक्रांतीचा ग्रामीण दलित जीवनातच पाया आहे आणि त्याच पायावर लिहिलेल्या अण्णा भाऊंच्या कथा-कादंबऱ्या ही साहित्यक्षेत्रात समाज संक्रमणाची पहिली किमया आहे. अत्यंत अल्पशिक्षित असला तरी उपजत शाहिराला चिंतनाची जोड आणि वैश्विक कार्याची जोड असेल तर तो अजोड साहित्यिकही होऊ शकतो, हे अण्णा भाऊंनी दाखवून दिले.

 अण्णाभाऊंची लेखणी धारदार होती. पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तारली नसून ती श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे, असं ते म्हणत. यांच्या लेखनाचा प्रेरणास्त्रोत सोशीत-उपेक्षितच होता.अण्णा भाऊंची निरीक्षण शक्ती अत्यंत सूक्ष्म आहे. नाट्यमयता हाही त्यांच्या लेखनशैलीचा आगळा-वेगळा गुण. ज्या उपेक्षितांच्या जीवनातून अण्णाभाऊंनी अनुभूती घेतली, त्यातील क्षणाचा वेग आणि आवेग त्यांच्या लेखनात जाणवत राहतो. लेखनातील लवचिक भावचित्रे अंगासरशा मोडीने साकार करण्याची त्यांची लकबही स्वतंत्र आहे. लेखन शैलीवर त्यांनी सर्वस्व अर्पण केलं होतं.


रशियाच्या इंडो-सोव्हिएत कल्चरल सोसायटी च्या निमंत्रणावरुन ते १९६१ साली रशियात गेले. त्यांवर त्यांनी लिहिलेले प्रवासवर्णन लोकप्रिय झाले. त्यांचे व्यक्तिमत्व विविध कलागुणांनी भरलेले होते. ते उत्तम अभिनय करीत. हातात डफ घेऊन शाहिरी कवने मोठ्या तडफेने गात. बुलबुल, बासरी, हार्मोनियम अशी वाद्येही ते वाजवीत. दांडपट्टा फिरवीत. शिवाय स्वतःच्या लिखाणाव्यतिरिक्त त्यांनी नवयुग, युगांतर आणि आचार्य अत्रेंच्या मराठा  वर्तमान पात्रातून अनेक लेख व पुस्तकांची परीक्षणे लिहिली. विद्यापीठातून अण्णाभाऊंवर अनेक प्रबंध सिद्ध केले आहेत. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांवर केवळ भारतीयच नव्हे, तर २२ परकीय भाषांत भाषांतरे झाली आहेत.


त्यांच्या फकिरा या कांदबरीला १९६१ चा राज्य सरकारचा  उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक त्यांच्या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करतात. (संदर्भ - मराठी विश्वकोश, प्रभाकर ओव्हाळ)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.