एक होता गंधर्व

पुस्तकाचे नाव -  एक होता गंधर्व
लेखक - डॉ. राम म्हैसाळकर



२५ ऑक्टोबर १९०५ रोजी नारायण श्रीपाद राजहंस, अर्थात्‌ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ह्यांनी नामांकित केलेल्या “बालगंधर्व ”ह्या मुलानं किर्लोस्कर नाटक मंडळीत प्रवेश केला. त्यांची शेवटची भूमिका असलेले नाटक संगीत एकच प्याला तुमसर येथे चार जून १९५५ रोजी सुरू झाले. रात्री नऊ वाजता सुरू झालेले हे नाटक दुसरे दिवशी पहाटे पाच जून रोजी संपले. रात्रभर नाटक रंगले... उत्तरोत्तर रंगतच गेले. जेव्हा नाटक संपले त्या दिवशी वटपौर्णिमा होती. मराठी रंगभूमीवरची देवतास्वरूप सिंधू त्या दिवशी कायमची अंतर्धान पावली. एकंदर पन्नास वर्ष बालगंधर्वांनी रंगभूमीवर सेवा केली. वयाच्या सतराव्या वर्षी उभी केलेली स्त्री वयाच्या सदुषष्ठाव्या वर्षापर्यंत वेगवेगळ्या स्वरूपात आबाल वृद्धांना रंजवीत होती. ही एक कमाल कामगिरी आहे. कुठल्याही पुरूष नटांने इतकी वर्षे स्त्री भूमिका केलेली नाही. भाऊराव कोल्हटकरांनी १७ वर्षे, मा. दीनानाथ ह्यांनी १६ वर्षे, केशवराव भोसले ह्यांनी १४ वर्षे, मा. कृष्णराव ह्यांनी १६ वर्षे स्त्री भूमिका केल्या.

 नारायणराव पन्नास वर्षे नायिका म्हणून वावरले. ह्या पन्नास वर्षात एकंदर सत्तावीस प्रकारच्या स्त्रिया त्यांनी रंगमंचित केल्या. हा देखील एक उच्चांक आहे.

संगीत मानापनाच्या पहिल्या प्रयोगासाठी किर्लोस्कर नाटक कंपनीच्या लोकांची उत्साहाने अगदी लगीनघाई उडाली असतांना बालगंधर्वांची एकुलती एक लहानगी मुलगी तडकाफडकी वारल्याची बातमी समजताच शुभारंभाचा प्रयोग बंद ठेवावा असे ठरताच "झालं ते झालं, माझ्या एकट्याच्या दु:खापुढे अनेक रसिकांचे सुख का हिरावून घ्यावे.. असे सांगून बालगंधर्व मेकअप करण्यासाठी गेले. तो प्रयोग अत्यंत यशस्वी झाला. असाच प्रकार मृच्छकटिक या नाटकाच्या प्रयोग च्या वेळी झाला होता. त्यांच्या उपवर झालेल्या मुलीच्या मृत्यूची बातमी समजूनही त्यांनी प्रयोग थांबवला नव्हता. 



अशा या असामान्य, रसिकमान्य कलाकाराच्या जीवनात अनेक चढ उतार आले. जशी श्रीमंती अनुभवली तसे जवळच्या माणसांकडून फसवल्या गेल्यामुळे बेहिशेबी कारभारामुळे व काहिशा छानछोकी स्वभावामुळे कर्जाचे डोंगरही उपसले. नंतर नंतर त्यांचे पाय अधू होऊ लागले. चालता सुद्धा येईना त्यामुळे  १९५५ साली  नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व रंगभूमीवरून निवृत्त झाले. 

उत्तर आयुष्यात काही चुकलेल्या निर्णयांनी विस्कटलेली आयुष्याची घडी सावरायला फार त्रास घ्यावा लागला. सिनेमा माध्यमात मात्र रमता आले नाही. भरगच्च नाट्यगृहातील दर्दी प्रेक्षकांची दाद घेणारा हा कलावंत कॅमेरासमोर कृत्रिम अभिनय करू शकला नाही. नाटक बंद झाल्यावर उपजिवीकेसाठी गायनाचे कार्यक्रम केले. परंतु पुढे दमा बळावल्याने नैराश्य वाट्याला आले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.