लेखक - कृ. भा. परांजपे
महाभारत हे काव्य नसून तीन हजार वर्षांपूर्वी घडलेला खरोखरचा इतिहास असून त्यातील चमत्कार सदृश घटनेमागे वैज्ञानिक तथ्ये लपले असल्याचा लेखकाचा दावा आहे.
त्या काळात काही परग्रह वासी हिमालयाच्या आसपास पृथ्वीवर आले. परग्रही माणसांच्या देखणेपणातील रुबाब, त्यांचे अंतराळातून जमिनीवर उतरणे आणि त्यांच्याजवळ असलेली सर्वनाशक अस्त्रे या सर्व गोष्टी पाहून पृथ्वीवरील माणसांवर परग्रहींची चांगलीच छाप पडली आणि मग परकीयांच्या सहृदय वागणुकीमुळे ते पृथ्वीवरील लोकांना आपलेच वाटू लागले होते. आकाशातून देवच उतरले, असेही काही लोकांना वाटले होते.
परग्रही पृथ्वीवर खासच कित्येक प्रकाश वर्षे दूर असलेल्या कुठल्या तरी अज्ञात सूर्यमालिकेतील ग्रहावरून आलेले होते. एवढा लांबचा प्रवास आणि जोखीम घेऊन किती लोक आले असतील? फार तर शेकड्यात मोजण्याइतकेच! हे लोक उघडच परतीची आशा बाळगून नव्हते. स्वत:जवळ विनाशक अस्त्रे असली, तरी पृथ्वीवर राज्य स्थापण्याचा त्यांचा विचार नव्हता. पृथ्वीवरील समाजाचे उद्बोधन करीत उर्वरित आयुष्य सुखाने व्यतीत करण्याचा या परग्रहींचा मानस होता. त्यांच्यातील शास्त्रज्ञ गुरुकुल पद्धतीने जनपदांपासून दूर अरण्यात आश्रम चालवित आणि ज्ञानदानाचे कार्य करीत. परग्रहींमध्ये स्थापत्यविशारद आणि इतर तंत्रज्ञ होते. पृथ्वीवरील समाजाला बांधकामात आणि इतर घडणावळीत ते मदत करीत. काही परग्रही लेखक आणि कलावंत सुद्धा होते. त्यांनी संगीत, चित्रकला, शिल्प इत्यादी कला पृथ्वीवरील लोकांत प्रचलित केल्या. लेखकांनी परग्रहींचे अनुभव, निरीक्षण आणि ज्ञान पुस्तकरूपाने एकत्रित करून सुरक्षित राखण्याचे प्रयत्न सुरू केले होते. वयाने छोटे-मोठे असलेले परग्रही आपापली आयुष्ये अशा रीतीने सकारात्मक कामात पृथ्वीवर व्यतीत करीत होते. पण निसर्ग कुणाला चुकला आहे? पृथ्वीवरील मानवजातीहून परग्रहींचा वंश वेगळा होता. त्यामुळे एका दृष्टीने परग्रहींना पृथ्वीवरील माणसांशी लैंगिक संबंध टाळावयाचा होता; तर दुसऱ्या दृष्टीने असा संबंध निसर्गक्रमाने घडल्यास त्याचे परिणाम टाळावयाचे होते. ही एक कसरत होती, तरी सुद्धा नैसर्गिक भावनांमुळे तोल सांभाळून राहावे लागत होते. पण अशी कितीही काळजी घेतली, तरी वंशसंकराच्या घटना अधूनमधून घडतच होत्या. महाभारतातील पहिला वर्णसंकर विश्वामित्र मेनकेत झाला.
दुर्वास ऋषींनी कुंतीला समागमविरहीत प्रजोत्पादन पद्धती शिकवली होती. पांडू राजा तपश्चर्येसाठी गेलेला असताना कोणती ने यास पद्धतीचा वापर करून आपत्य प्राप्ती करून घेतली.
महाभारतातील जी काही अयोनिज पात्रे आहेत ती परग्रहवाससींनी शिकवलेल्या पध्दतीने अवतरली असा लेखकाचा दावा आहे. त्यामुळे पाचही पांडव शक्तीकुंभ होते. त्यामुळेच हजारोंच्या संख्येत असलेल्या शत्रू सैन्याशी ते एकट्याने लढून विजयी व्हायचे.
युध्दात जी काही संहारक अस्रे वापरली गेली ती फक्त काही विशिष्ट योद्ध्यांकडेच होती. जे कोणत्या न कोणत्याही कारणाने परग्रह वासीयांच्या संपर्कात आलेले होते. आणि या युद्धात पृथ्वीवरील अनेक साम्राज्य सामील झालेली होती. काही जणांकडे तर विमाने सुध्दा होती. परंतु युद्ध असे सगळे तंत्रज्ञ मारले गेल्यामुळे हे तंत्र सुद्धा लयाला गेले.
पितामह भीष्मांच्या त्या चितेकडे बघता बघता व्यासांना वाटले “संपूर्ण पृथ्वीवरील विभिन्न देशातील प्रगल्भ लोकसंख्येचा स्तर या महायुद्धात मारला गेला आहे. पृथ्वीवरील भिन्न प्रदेशातील संबंध आता तुटून तर जाणार नाहीत ना? असे झाले, तर पृथ्वीवरील देश वेगळे होतील. सांस्कृतिक देवाणघेवाण संपुष्टात येईल. अशा परिस्थितीत आताची आमची प्रगत संस्कृती नामशेष होणार नाही ना? कौरव-पांडवांच्या युद्धात वापरली गेलेली अस्त्रे मग काल्पनिक वाटतील. यानांचे आणि विमानांचे उल्लेख निव्वळ स्वप्नरंजन ठरेल. वेद दुर्बोध होतील. आमच्या वैज्ञानिक ज्ञानाचा संदर्भ तुटेल. आमचे शास्त्रशुद्ध विचार कविकल्पना मानल्या जातील. आमची भाषा लोपेल. आमचे ग्रंथ, कलाकृती आणि वस्तू इतिहास-संशोधनाचे विषय ठरतील. हे ग्रंथ, कलाकृती आणि वस्तू मग संग्रहालयांमध्ये लोकांना प्राचीन गोष्टी म्हणून बघण्यासाठी ठेवण्यात येतील. यासाठी काहीतरी करायला हवे. मी काय करावे? मला वाटते. आमचे ज्ञान संकलित करून ठेवावे. वेदांची वर्गवारी करून ऋषींच्या नावानुसार सूचिबद्ध सुक्ते संग्रहित करावीत. परग्रही आता जवळपास नाहीसेच झाले आहेत. पण त्यांनी दिलेले ज्ञान जतन व्हायला हवे. म्हणून काळाच्या ओघात वेद नष्ट होऊ नयेत म्हणून ते देवांचे अथवा अपौरुषेय आहेत अशी धारणा लोकांत रुजवावी. वेदांच्या भाषेची मोडतोड होऊ नये म्हणून प्रत्येक सूक्तातील शब्दांची संख्या आणि क्रम पक्का मोजून ठेवावा. आमचे विज्ञान पुराण म्हणून सांगावे. कौरव-पांडव महायुद्धाची हकिगत सुद्धा इतिहास म्हणून लिहून ठेवावी. जितके काही जतन करून ठेवता येईल तितके करावे. मग भविष्यात कुणीतरी कधीतरी सत्य जाणेल. आमचे ज्ञान भावी मानवी पिढ्यांना उपयोगी पडेल.
महाभारताची आधुनिक काळातील प्रश्नांची औचित्य सांगणारी वैज्ञानिक कथा लिहिताना लेखकाचा चमत्कारजन्य घटनांची वैज्ञानिक उकल केल्याचा दावा आहे तोच मुळी एक चमत्कार वाटतो.