लेखक - ख्रिस्तोफर सी डाॅयल
अनुवाद - मीना शेटे-संभू
महाभारताच्या एका अज्ञात पैलूंवर आधारीत ही कादंबरी प्रत्यक्षात थरारक रहस्यकथा आहे.भूतकालीन रहस्ये उलगडताना वर्तमानातील कट कारस्थानाशी सामना करणारे कथानक.
सम्राट अशोकाच्या काळात त्यांच्या एका गुप्तहेराला एका गुहेत महाभारतकालीन गुपीतांचा मागोवा मिळाला. जर या गोष्टी जगजाहीर झाल्या तर सगळ्या मानव जातीचा विनाश होईल या भितीने सम्राट अशोकाने आपल्या विश्वासातील आठ साथीदारांसह त्या गुप्तहेरांच्या मदतीने ती गुपीते एका दुर्बोध ठिकाणी सुरक्षित ठेवली व त्या नऊ जणांना गुप्ततेची शपथ दिली. ते रहस्य भविष्यात कधीही कोणालाही समजू नये यासाठी सुरक्षित ठिकाण दर्शवण्यासाठी वेगवेगळे धागे काही शिलालेखातून सोडले असून त्या शिलालेखांचा मागोवा काही ग्रंथातील श्लोकांतून घेतला गेला होता.
नऊ अज्ञात पुरुषांचा गटाबाबत अनेक अफवा असून काही प्राचीन ग्रंथात सुध्दा त्याचा उल्लेख होतो. ब्रुनो बेगेर या जर्मन मानववंशशास्त्रज्ञाच्या रोजनिशीत तिबेटमधील एका पुरातन मंदिरातील संस्कृत कागदपत्रात नऊ अज्ञात पुरुष या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गुप्त गटाविषयी भाष्य करण्यात आले असून उडणाऱ्या वाहनांविषयी आणि प्रचंड प्रमाणात विनाशकारी असणाऱ्या बाणांविषयीही लिहिलेलं आहे. एक दंतकथा अशीही सांगितले जाते की, अशा अस्रांचा साठा सापडल्यामुळे सम्राट अशोकाने महाभारतातील विमान पर्व पुर्णपणे गाळून टाकले असून त्यावेळच्या महाभारत ग्रंथाच्या सगळ्या प्रती जाळून टाकल्या होत्या.
अजय अमेरिकन व्यावसायिक होता. एका रात्री त्याच्या लॅपटॉपवर लागोपाठ पाच ई - मेल आल्या. दिल्लीत राहणाऱ्या त्याच्या काकांनी त्या पाठवल्या होत्या. पहिल्या ई मेल मध्ये फक्त ९ चा अंक होता. एकात लिहिलं होतं, "मला काही झालं तर ९ चा शोध घेतला पाहिजे. गेली पंचवीस वर्षे मी सांभाळून ठेवलेली इतिहासाची दोन हजार वर्षे आता तू खुली केली पाहिजेस."
दुसऱ्याच दिवशी त्याला काकांचा खुन झाल्याची बातमी मिळाली. तो भारतात आल्यावर त्याच्या अपहरणाचा प्रयत्न झाला.
आपल्या मित्राच्या मदतीने अजय आता दोन हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासात काय रहस्य आहे याचा शोध घेणार होता...
प्रागैतिहासिक सुत्रावर आधारित कथानक असुन मती गुंग करणारे रहस्य व नाट्यमय थरार पकड घट्ट ठेवतो. वेगवान कथानक असून लेखकाची ही पहिली कादंबरी असे वाटत नाही.