श्वासपाने

पुस्तकाचे नाव - श्वासपाने
लेखक - राही अनिल बर्वे





कसलाही आकृतीबंध नसलेले खळाळणाऱ्या झऱ्यासारखे वाहत बेधुंद, बेपर्वा आयुष्यातील आठवणींचा कल्लोळ माजवणारे हे पुस्तक एक अचाट अनुभव देतं. 
जुन्या आठवणी लक्षात राहण्याचे मुख्य कारण हे असते की, आपण त्या उगाळत राहतो, व त्या कळत नकळत उगाळल्या जातात. 

श्वासपाने वाचतांना अनेक सिनेमे, अनेक व्यक्तीरेखा, अनेक पुस्तके, अनेक आठवणी, अशा अनेकांभोवती झिगझॅग फिरत राहतो. एकदा का या झिगझॅग वर बसल्यावर आपण कितीही गरगरणे, कितीही गुदमरून, कितीही घाबरलो तरी आपल्याला मधेच उतरता येत नाही. अपरिहार्यपणे आपल्याला राहीसोबत त्याची पाने श्वासावीच लागता. (सौमित्र.) 

दहावीनंतर शिक्षणाला बाय बाय करुन अॅनिमेशन स्टुडिओ उभा करण्याचे स्वप्न साकारण्यासाठी धडपड सुरू झाल्यावर कधी हाती अफाट पैसा तर कधी बसच्या तिकिटाचे वांदे असं खालीवर करीत तुंबाडने मन व्यापायला सुरुवात केली.मनासारखा तुंबाड पडद्यावर यायला मोठा काळ जावा लागला. 

जो मुलगा वयाच्या वयाच्या तीन साडेतीन वर्षे बोलत नव्हता तो पुढे सिनेमाच्या भाषेत बोलणार आहे. वडिलांसारखा लेखक होणार आहे हे त्याच्या आईलाही माहिती नव्हती. वयाच्या अकराव्या वर्षी त्याने पहिली गोष्ट लिहिली होती. आईने सांगूनही शाळेतील शिक्षकांचा विश्वास बसला नव्हता. 

आईला झालेला स्टेज फोर ब्रेन ट्युमर चे निदान झाल्यावर आईचे राहिलेले आयुष्य ठिकठाक जावे. या भावनेने झोपेत तिचा आवाज आला तर ताबडतोब जाग यावी म्हणून किंचित कमी ऐकायला येणाऱ्या डाव्या कानावर तातडीने उपचार म्हणून केलेली छोटीशी सर्जरी फेल झाली आणि डावा कान कायमचा बहिरा झाला. तेव्हापासून लिहायला सुरुवात केली. कधी डोके रिकामे व्हावे म्हणून, कधी स्वत:च्या चुकीच्या वर्तणुकीकडे पाहायचे असेल तर महिन्या- वर्षापूर्वीचा पुरावा शिल्लक राहतो. 

हजारदा सोडलेल्या सिगरेटची गोष्ट सांगीतल्यावर लेखक देवाला वाकुल्या दाखवणाऱ्या इजिप्तच्या एका फेरोची गोष्ट ऐकवतो. शाळेत असतांना जतिनकाकाकडे केलेला अभ्यास, पैसा कमवण्याचे स्वप्न, परिक्षेत करु न दिलेल्या काॅपी प्रकरणासह अनेक दिग्दर्शक, सिनेमा, पुस्तकांविषयी भरभरून चर्चा होते. अगदी निर्लेप मनाने आयुष्यात कोण कसे आले गेले हे ही सांगितले जाते. स्वता:च्या कामाचे मूल्यमापन अगदी तटस्थपणे केले आहे. मांझा हा लघुपट पुर्ण झाल्यावर मला कलाकारांना डिरेक्ट करता आलं नाही याची कबुलीही मिळते

खरं तर श्वासपाने हा मुळातच अनुभव घ्यावा असा आहे. आठवणींचा हा प्रवाह जिकडे वळत गेला तिकडे वळवलेला म्हणून पुढे मागे झालेला घटनाक्रम कुठेही अडखळत नाही. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.