नाइट

पुस्तकाचे नाव - नाइट
लेखक - एली वायझल
अनुवाद - आशा कर्दळे


या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य म्हणजे‚ छळछावणीतले दाहक अनुभव आपल्याला एक लहान पंधरा वर्षाचा मुलगा सांगतो आहे.


ट्रान्सिल्वानियामधल्या लहानशा सिघेट गावातल्या ज्यूंची ही कहाणी एका पंधरा वर्षांच्या लहान मुलानं प्रत्यक्ष पाहिली‚ अनुभवली आहे. त्या गावातले ज्यू कसे होते? तर भोळे‚ श्रद्धाळू‚ नशिबावर हवाला ठेवणारे‚ काहीसे कृतिशून्य! तसं नसतं तर नाझींची राक्षसी कृत्यं प्रत्यक्ष पाहून आलेल्या गावातल्याच एका माणसाचं (मोशे बीडल) म्हणणं त्यांनी ऐकलं असतं. त्याला वेडं ठरवलं नसतं. नंतरही देश सोडून‚ पळून जायची हिंमत केली असती; पण ते लोक फारच आशावादी होते. ही पार्श्वभूमी फार अस्वस्थ करणारी आहे.
 


 त्याच्या आईवडील बहीणी सह ऑशवित्झ छळछावणीत आल्यावर दुसऱ्याच दिवशी आई आणि बहिणीशी ताटातूट झाल्यावर त्यांचे पुढे काय झालं हे कधीच समजलं नाही. वडिल मात्र त्याच्या सोबत होते. मुलासमोर बापाला किंवा बापासमोर मुलाला झालेली मारझोड त्यांनी मख्खपणे पाहिली. सहन केली. उपासमार व आजारपणामुळे वडिलांचा मृत्यूकडे जाणारा प्रवास बघतांना एलीचं मन निर्दयी झालं होतं. 

त्याला लहानपणापासूनच देवाची आणि धर्मग्रंथांची ओढ होती. ज्यूंवरचे अत्याचार पाहून त्याच्या मनातली देवावरची श्रद्धा हळूहळू नष्ट झाली. 

‘ती रात्र मी कधीच विसरणार नाही. त्या रात्रीनं माझं सारं आयुष्यच एक प्रदीर्घ रात्र करून टाकलं. तो धूरही मी कधी विसरणार नाही. कोवळ्या मुलांचे ते चेहरे‚ त्यांची इवलीशी शरीरं विशाल निळ्या आभाळाखाली धुराचा लोट बनून गेली होती. माझ्यातली श्रद्धा ज्यांनी भस्मसात करून टाकली‚ त्या ज्वाळाही मी कधी विसरणार नाही. ज्या क्षणांनी माझ्या देवाचा‚ माझ्या आत्म्याचा मुडदा पाडला‚ त्या क्षणांना विसरता येणं शक्य आहे का?’ 

असे खिळवून ठेवणारे शब्द.

एली वायझल ह्यांना १९८६ साली नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. 

नव्याने सापडलेल्या कागदपत्रांच्या पुराव्यांनुसार हे दिसून आलं आहे की‚ सत्तेत आल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये‚ जर्मनीतल्या नाझींनी ज्यूंना जरासंही स्थान नसणारी समाजव्यवस्था उभारण्याचं ठरवलं होतं. मात्र‚ सत्तेच्या अखेरच्या पर्वात त्यांचं ध्येय बदललं. त्यांना जगाचा विध्वंस करून‚ त्यातलं ज्यूंचं अस्तित्व समूळ नष्ट करून टाकायचं होतं. म्हणूनच त्यांनी रशियात‚ युक्रेनमध्ये‚ लिथुआनियात ‘अखेरचा उपाय’ अवलंबला. तो म्हणजे लाखो ज्यू स्त्री-पुरुषांवर आणि बालकांवर मशीनगनच्या फैरी चालवणं आणि त्याच बळींकडून नुकत्याच खणून घेतलेल्या प्रचंड सामूहिक खड्ड्यांमध्ये त्यांचीच प्रेतं फेकून देणं. त्यानंतर ही प्रेतं खणून काढून ती जाळून टाकण्यासाठी खास चमूदेखील नेमण्यात आले होते. अशा प्रकारे इतिहासात पहिल्यांदाच‚ ज्यूंची दोनदा हत्या करण्यात आली‚ इतकंच नव्हे तर त्यांना कब्रस्तानात चिरविश्रांती घेण्याच्या अधिकारापासूनही वंचित ठेवण्यात आलं. हे तर उघडच आहे की‚ हिटलर आणि त्याच्या साथीदारांनी पुकारलेलं युद्ध हे काही फक्त ज्यू स्त्री-पुरुष आणि बालकं यांच्याविरोधातच नव्हतं‚ तर ते ज्यू धर्म‚ ज्यू संस्कृती-परंपरा आणि म्हणूनच ज्यू वारशाविरोधात होतं.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.