पुस्तकाचे नाव - आवा मारू टायटॅनिक ऑफ जापान
लेखिका - रेई किमुरा
अनुवाद - चारुलता पाटील
टायटॅनिक बुडाली.जवळपास बाविसशे पैकी सातशे प्रवासी वाचले. जेम्स कॅमेरोन ने चित्रपटाद्वारे ही घटना जगप्रसिद्ध केली. अशी प्रसिध्दी मात्र आवामारु या अवाढव्य जपानी जहाजाला मिळाली नाही.
दुसऱ्या महायुद्धाचा वणवा पेटलेला असताना जपाननं सिंगापूर मधील ब्रिटिशांची सत्ता उलथवून तिथे आपले हातपाय पसरवले, परंतु अल्पावधीतच जपानी साम्राज्याच्या सत्तेचा सूर्य ढळू लागला. सिंगापूर मधले सारे जपानी पराजयाच्या कल्पनेने त्यानंतर उसळणाऱ्या सुडाग्नीच्या दहशतीने प्रचंड घाबरले. जीव वाचवण्यासाठी जपानला पळून जाण्यासाठी आटापिटा करू लागले. जपान सिंगापूर मधल्या जपानी नागरिकांना परत आणण्यासाठी आवा मारू नावाचे प्रचंड मोठे जहाज पाठवले.
अमेरिकन सरकारने दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी १९४५ साली आवा मारु जहाजाला सुरक्षेची हमी दिली होती. पण लष्करी अधिकाऱ्यांच्या युध्दखोर उन्मादाने मिळालेल्या संदेशांकडे दुर्लक्ष केले. या चुकीने आवामारु वरील दोन हजार लोकांना जलसमाधी मिळाली.
टायटॅनिक च्या घटनेने काल्पनिक प्रेमकथा फुलवली. आवामारु च्या घटनेभोवती लेखिकेने स्वतः चे बालपण, आई वडीलांचा इतिहास शोधणाऱ्या तरुणीची मनात घर करणारी काल्पनिक कथा रंगवली आहे
क्योको तानाकाला तिच्या मृत्यूशय्वेवर असलेल्या आईने अखेरच्या क्षणी एक रहस्य, क्योकोच्या आयुष्यातील एक हरवलेला तुकडा हवाली केला. त्याबद्दल खुप काही सांगायचे होते पण तत्पूर्वी प्राणज्योत मालवली.
आईने लपवलेल्या पेटीत एक फोटो होता. दोन जोडपी, एक छोटी मुलगी, तिच्यापेक्षा थोडासा मोठा एक मुलगा एवढेच होते त्या फोटोत. खाली लिहिलेलं होतं, " सिंगापूर. २७ मार्च १९४५ निघण्यापूर्वीचा दिवस. "
आणि आईचं एक ओळखपत्र होतं, १९४२ साली सिंगापूरमध्ये दिलं गेलेलं.
आपली आई सिंगापुरला कधी गेली होती? ही गोष्ट तिने आपल्यापासून का लपवून ठेवली. फोटोमध्ये तिच्या आईवडीलांसोबत असलेलं दुसरं जोडपं कोण होतं.. अनेक अनुत्तरित प्रश्न...
ह्या सगळ्या गोष्टींचा तपास करण्यासाठी क्योको तानाका सिंगापुरला जाण्यासाठी निघाली. ते साल होतं १९७०.
जी उत्तरं तिला मिळाली त्यांनी तिचं सगळं भावविश्व उलटं पालटं झालं.
युध्दाच्या अखेरीस सिंगापुरहून जापानला जाण्यासाठी त्यांना आवा मारू या बोटीचे तिकीट मिळाले होते. त्या प्रवासाच्या आदल्या दिवशी तो फोटो काढला होता.