जॅपनीज रोझ

पुस्तकाचे नाव - जॅपनीज रोझ
लेखिका - रेई किमुरा
अनुवाद - स्नेहल जोशी


दुसऱ्या महायुद्धात जापानने पर्ल हार्बरवर हल्ला करून अमेरिकेला युध्दात ओढले. सुरुवातीच्या काही विजयानंतर जपानची पिछेहाट सुरू झाली. अमेरिकन विमाने जपानवर बाॅम्ब वर्षाव करू लागली. जपानने अगोदर वीस वर्षांवरील तरुणांची सक्तीची सैन्य भरती केली नंतर ही सतरा वर्षांपुढील तरुणांनाही सक्ती केली. या मुळे अनेकांच्या आयुष्याची उलथापालथ झाली. 

जपानी विमानदलाचे नुकसान होत होते. तेव्हा कामिकाझी वैमानिकांचे दल उभारले जाऊ लागले. या वैमानिकांना जुजबी प्रशिक्षण देऊन त्यांनी शत्रूच्या विमानावर धडकून शत्रूसह स्वतःचाही आत्मघात करून घ्यायचा. अशा काही प्रशिक्षण छावण्यांपैकी एका छावणीच्या कागदपत्रांमध्ये एक विचित्र गोष्ट एका माहितीपट निर्मात्याला मिळाली, छावणीत दाखल होणाऱ्या पायलटांमध्ये "सायुरी मियामोटो" हे नाव होते. पण बाहेर पडलेल्यांमध्ये नव्हते. ते नाव होते "रिका कोबायशी" जे दाखल झालेल्या यादीत नव्हते. ही दोन्ही नावे स्रीची असल्यामुळे आणि कामिकाझी दलात स्रियांना सामील केले जात नसे म्हणून त्याने ह्याच्या तळाशी जाण्यासाठी एका इतिहासतज्ञाची मायुमी ओनेडेराची मदत घेतली. 

मायुमीने तीन महिने युध्द नोंदणी करणाऱ्या कार्यालयात, म्युझियम मधे, शेवटी लायब्ररी मध्ये अनेक कागदपत्रे धुंडाळून जपान मधील एकूण १०४  रिका कोयाबशी मधून हव्या असलेल्या रिका कोयाबशीला शोधून काढले. आता तिचे वय पंच्याऐशी होते. 

जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केला तेव्हा ती फक्त एकोणीस वर्षाची होती. सक्तीच्या सैन्यभरतीत तिच्या मैत्रिणीचा होणाऱ्या पतीला, तिच्या धाकट्या भावाला जबरदस्तीने नेलं होतं. त्यांची ख्यालीखुषाली समजून घेण्यासाठी तिच्या मैत्रिणीसह ती टोकीओमध्ये नर्सचं काम करु लागली. या निमित्ताने जखमी सैनिकांची सेवा करता येईल ही देशभक्तीची भावनाही होती. 
दुर्दैवाने तिच्या मैत्रिणीचा होणारा पती जखमी अवस्थेत हाॅस्पिटलमधे तिच्या समोर मेला. तिचा भाऊ एका बोटीवर अमेरिकन हल्यात मारला गेला. सायकल मिळवण्यासाठी तिच्या मैत्रिणीला शरीर वापरावे लागले. या सगळ्यामुळे ती संतापू लागली. मनात बदला घेण्याची भावना प्रबळ होऊ लागली. 

हाॅस्पिटलमधे जखमी अवस्थेत दाखल झालेल्या दोन वैमानिकांकडून तिला कामिकाझी वैमानिक दलाची माहिती मिळाली.

कामिकाझी आत्मघात करून घेऊ शकला नाही तरीही तो मारला जातो. या दलात प्रवेश केल्यावर परतीचे सगळे मार्ग बंद होतात. 

कामिकाझी दलात स्रियांना सामील करीत नाही, हे लक्षात घेऊन तिने पुरुषी वेषात या दलात प्रवेश केला. तिचं बिंग फुटतय की काय अशीही एक वेळ आली.

तिला बदला घ्यायचा होता. देशासाठी बलिदान द्यायचं होतं..

तरीही ती तिच्या प्रशिक्षकाच्या प्रेमात पडली होती. 

दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर सत्य आणि कल्पनाविलासाची ही अंतर्मुख करणारी उत्कंठावर्धक कथा पुर्ण झाल्याशिवाय सोडवत नाही. स्नेहल जोशींनी केलेला अनुवादाची अत्यंत सुरस झालेला आहे. 










Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.