रेशीमगाठी

पुस्तकाचे नाव - रेशीमगाठी
लेखिका - कांचन काशिनाथ घाणेकर




हा व्यक्तिचित्रणात्मक लेखसंग्रह आहे. हे लेख त्यांच्या कार्यकर्तृत्वाचं मुल्यमापन नसून सहवासात आल्यावर कसे भावले याचं प्रांजळ कथन आहे. जयप्रभा स्टुडिओचंही व्यक्तिचित्रण आहे. 

आई सुलोचना बदल पहिला लेख वाचल्यावर तीन चार दशकांपूर्वी ऐकलेली भालजी पेंढारकर, राजा परांजपे, ललिता पवार, चंद्रकांत मांडरे, रणजित देसाई, गदिमा, लिला गांधी, सतिष दुभाषी, यशवंत दत्त, माई मंगेशकर, लता मंगेशकर अशा व्यक्तिमत्वांचा आपल्यावर कसा प्रभाव पडला हे सांगताना आपल्यालाही अनेक गोष्टी नव्याने माहिती होतात. 

भालजी पेंढारकराचा शिस्तबद्ध दिनक्रम. मोठं नाव असलेली नायिका सेटवर उशीरा आली म्हणून तडकाफडकी काढून टाकलं. 

उच्च शिक्षण घेतांना सरोजिनी वैद्यांशी झालेली जवळीक. त्यामुळे पहिले पुस्तक लिहिताना मिळालेला आत्मविश्वास. नाथ हा माझा च्या प्रकाशन समारंभाला त्या विषयी बोलण्यासाठी त्या प्रमुख वक्त्या होत्या. अध्यक्ष रणजित देसाई होते. 

वैवाहिक जिवन अस्थिर झाल्यावर व नाच ग घुमा प्रकाशित झाल्यावर रणजित देसाईंनी स्विकालेलं मौन.. 

ललिता पवारांचा खाष्ट सासूचा अभिनय बघून प्रत्यक्षातही त्या तशाच असतील म्हणून त्यांना घरकामासाठी कोणीही मिळणं अवघड झालं होतं. मात्र त्यांच्या अभिनयांची उंची बघून दिलीप कुमार आणि राजकपूर ने एका एका सिनेमानंतर त्यांच्यासोबत परत काम केले नाही. 

आपल्याच तोऱ्यात राहणारे सतिष दुभाषी. प्रेक्षक आम्हाला चार तास विकत घेतात त्यानंतर आम्ही काय करावं हे विचारण्यचा त्यांना अधिकार नाही. असं ते जाहीर मुलाखतीतून गर्जत असत. 

यशवंत दत्त. बंगाली आडनाव वाटणारा मराठमोळा कलाकार, अफाट वाचन, तीव्र स्मरणशक्ती, जी ए कुलकर्णीच्या कथांचे सुक्ष्म परिक्षण करणारा, कवीता करणारा भाषा विषयाचा द्विपदवीधर वाटणारा जेमतेम आठवी शिकलेला होता. 

माई मंगेशकरांकडून मिळालेलं प्रेम. लता मंगेशकरांचा मदतीचा मिळालेला हात. 

जयप्रभा स्टुडिओच्या वाट्याला आलेले चांगले वाईट दिवस.. 

सगळं कसं वेधून घेणारं झालं आहे. जेष्ठ नागरिकांना किंवा आत्ताची पन्नाशी पार केलेल्या पीढीला भुतकाळात घेऊन जाते. 




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.