शरदचंद्र चट्टोपाध्याय

शरत्‌चंद्र चट्टोपाध्याय  
(१५ सप्टेंबर १८७६—१६ जानेवारी १९३८). 



प्रख्यात बंगाली कादंबरीकार आणि कथाकार. वास्तववादी कादंबरीकार म्हणून शरदबाबूंचे नाव वंग साहित्यात लोकप्रिय झाले आहे. खालच्या थरातील उपेक्षित समाजाचे अंतर्बाह्य चित्रण इतक्या मनोवेधकतेने, सहृदयतेने आणि मार्मिकतेने करणारा कादंबरीकार भारतीय साहित्यात झाला नाही, असा त्यांचा सार्थ नाव लौकिक आहे. शरदबाबूंची स्त्रीसृष्टी इतक्या वैविध्याने व वैचित्र्याने नटलेली आहे, की ती पाहून मन थक्क होते. परंपरागत रूढ चालीरीतींत अडकलेल्या भारतीय स्त्रीच्या भावभावनांने दर्शन घडविण्याचे त्यांचे कसब आगळे आहे.



 बंगालमधील स्त्रियांनी तर शरदबाबूंना आपले ‘सुहृद’ मानून त्यांचा गौरव केला व त्यांच्याविषयी आपला आदरभाव व्यक्त केला. या पतितांना ते ‘शापभ्रष्ट देवता’ समजतात. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांत विविध स्वभावांची व थराची पात्रे दिसत असली, तरी त्यांचा प्रामुख्याने विषय आहे पददलित, पतित, दुःखी-कष्टी माणसेच. वंग साहित्यात प्रचलित असलेले जुने लेखनतंत्र त्यांनी झुगारून दिले व स्वतःच्या स्वतंत्र तंत्राचा व शैलीचा पाया घातला. 



पथेर दाबी  या त्यांच्या राजकीय कादंबरीतील क्रांतिकारक विचारांनी वंग समाजातच नव्हे, तर ब्रिटिश राज्यकर्त्यांतही खळबळ उडवून दिली. तिची वाढती लोकप्रियता पाहून ब्रिटिश सरकारने ती जप्त केली. भारती (१९४०) या नावाने तिचे पु. बा. कुलकर्णी यांनी मराठीत भाषांतरही केले आहे. त्यांच्या बहुतेक कादंबऱ्या भारतीय भाषांतून अनुवादित झाल्या आहे आणि काही कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले आहेत. ( संदर्भ - मराठी विश्वकोश)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.