गंगाधर गाडगीळ

गंगाधर गाडगीळ : 
(२५ ऑगस्ट १९२३ - १५ सप्टेंबर २००८). 



आधुनिक मराठी साहित्यिक. कथा, कादंबरी, प्रवासवृत्त, समीक्षा, नाटक, बालसाहित्य, अर्थशास्त्रविषयक इ. विविध प्रकारचे लेखन. महाविद्यालयात शिकत असतानाच कथालेखनास प्रारंभ केला आणि एक नामवंत नवकथाकार म्हणून लौकिक मिळविला. मराठी कथेला वेगळे वळण देण्यात गाडगीळांचा वाटा मोठा आहे. मानवाचे बाह्यवर्तन आणि अंतर्गत भावविश्व ह्यांत अनेक कारणांनी विसंगती निर्माण होते, ह्याची जाण ठेवून त्याच्या अनपेक्षित, उठवळ व चमत्कारिक उक्तिकृतींमागील सूक्ष्म-तरल भावना व संवेदना आणि सुप्त मनातील संज्ञाप्रवाह यांचा गाडगीळांनी वेध घेतला. यंत्रयुगातील शहरी जीवनातल्या ताणाबाणांचे सूक्ष्मसूचक दर्शन त्यांच्या कथांनी घडविले आहे. नवीन्यपूर्ण प्रतिमा व लवचिक, मार्मिक शब्दकळा यांमुळे त्यांच्या कथांतील जीवनदर्शन कलात्मक झाले आहे. साचेबंद घटनाप्रवणता कमी करून मनोविश्लेषणावर भर देणारी जी नवकथा १९४५ पासून रूढ झाली, तिचे ते अध्वर्यू समजले जातात. गाडगीळांच्या कथाविश्वातील व्यक्ती मध्यमवर्गीयच असल्या, तरी त्यांच्या अनुभवांकडे सखोलतेने पाहण्याच्या वृत्तीमुळे त्यातील जीवनदर्शन अस्सल वाटते.



लैंगिक मनोवृत्तींचा वास्तव संघर्ष चित्रित करणारी लिलीचे फूल (१९५५) ही त्यांची पहिली कादंबरी लोकमान्य टिळकांच्या जीवनावरील दुर्दम्य (खंड १,१९७० आणि खंड २,१९७२ ) ही त्यांची कादंबरी म्हणजे चरित्रात्मक कादंबरीलेखनाचा मराठीतील एक महत्त्वाचा प्रयोग होय.



 प्रायोगिक रंगभूमीवर आलेले ज्योत्स्ना आणि ज्योती (१९६४) हे समस्याप्रधान नाटक वगळल्यास त्यांचे एकांकिकादी इतर नाट्यलेखन खेळकर विनोदाने नटलेले असून, महाविद्यालयीन रंगभूमीवर खूपच लोकप्रिय झालेले आहे. लखूची रोजनिशी  (१९४८), मार्क ट्‍वेनच्या टॉम सॉयर ह्या कादंबरीवरून लिहिलेले धाडसी चंदू  (१९५१), आम्ही आपले थोर पुरुष होणार  (१९५७) ह्यांसारखी बालांसाठी त्यांनी लिहिलेली पुस्तकेही लोकप्रिय झाली आहेत. १९८१ च्या अ. भा. साहित्य संम्मेलनाचे अध्यक्ष होते. एका मुंगीचे महाभारत या आत्मचरित्राला १९९६ चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. ( संदर्भ - मराठी विश्वकोश)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.