जयवंत दळवी

जयवंत दळवी
 (१४ ऑगस्ट १९२५ - १६ सप्टेंबर १९९४ )




माणसाच्या आयुष्यातील भोगवट्याचे, अतृप्त वासनांचे, सुख-दुःखांचे दशावतार त्यांच्या कथा, कादंबरी, नाटक यांत दिसतात. आदिम कामेच्छांचे अस्वस्थ करणारे चित्र त्यांच्या साहित्यात आढळते. वेडी, अर्धवट पात्रे त्यांच्या साहित्यकृतींतून डोकावतात. ‘चक्र’ ही पहिलीच कादंबरी मराठी कादंबरीच्या अनुभव क्षेत्राची कक्षा वाढविणारी आणि प्रादेशिकतेची कोंडी फोडणारी अगदी वेगळ्या विषयावरची कादंबरी म्हणून वाखाणली गेली. मुंबईतील झोपडपट्टीमधील गलिच्छ जीवन, तेथे वस्ती करणार्‍यांचे उघडे-नागडे आयुष्य चितारताना पत्रकारितेच्या काळात आलेले जिवंत अनुभव दळवींना उपयोगी ठरले. बकाल परिसरात पशुतुल्य आयुष्य जगणार्‍या तेथील व्यक्तींच्या स्वप्नांचा, जीवनमूल्यांचा वेध दळवी घेतात. मध्यमवर्गीयांना सर्वस्वी अपरिचित असलेल्या चित्रविचित्र संघर्षाचे प्रत्ययकारी चित्रण ते करतात. कादंबरीला कथानक नाही, पण त्यातील व्यक्तिचित्रे महत्त्वाची आहेत आणि ती दळवींनी प्रभावीपणे उभी केली आहेत. 




मराठीतील एक अभूतपूर्व कादंबरी म्हणून ‘चक्र’चा उल्लेख केला जातो. ‘सारे प्रवासी घडीचे’मध्ये अस्सल कोकणी माणसांची व्यक्तिचित्रे दळवींनी रंगवली. 



वरून भोळीभाबडी वाटणारी पण मोठी बिलंदर माणसे दळवींनी या पुस्तकात उभी केली आहेत. ‘ठणठणपाळ’ हे टोपणनाव धारण करून ‘ललित’ मासिकात त्यांनी ‘घटका गेली पळे गेली’ हे सदर वीस वर्षे चालविले. अत्यंत मार्मिक आणि तरल विनोदाचा वस्तुपाठच त्यांनी जाणत्या वाचकांसमोर ठेवला. संदर्भ - महाराष्ट्र नायक)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.