दया पवार

दया पवार 
( १५ सप्टेंबर १९३५ - २० सप्टेंबर १९९६ ) 



पुर्ण नाव दगडु मारुती पवार.यांच्या पहिल्याच ‘कोंडवाडा’ या कविता संग्रहाला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला. त्यानंतर आलेल्या ‘बलुतं’ या आत्मकथनाचा गुजराती, हिंदी, जपानी, जर्मन, फ्रेंच आदी भाषांत अनुवाद झाला.  'मदर ऑफ ऑल दलित बायोग्राफी' ठरलेल्या बलुतंने समाजव्यवस्थेत हस्तक्षेप करून एका व्यापक सांस्कृतिक आंदोलनाचा पाया घातला. ज्याने एका वैचारिक चळवळीला वाट करून दिली आणि कालचे सारेच मुके बोलायला लागले, व्यवस्थेला प्रश्न विचारू लागले.  ‘बलुतं’मुळे दया पवार यांचे नाव सर्वदूर पोहोचले.



 दलित जीवनातील दाहक दुःख-भोगांचे शब्दांकन करताना पवार केवळ विद्रोहाची आक्रस्ताळी भूमिका घेत नाहीत. त्यांच्या लेखनातील व्यासंग, विश्लेषणपरता, चिंतनशीलता, परखडपणा, संवेदनशीलता हे गुण सर्वांना अंतर्मुख करतात.  आपल्या साहित्य-निर्मितीच्या प्रक्रियेकडे गंभीरपणे पाहणारे दया पवार मनाच्या अवस्थेतून, बेचैनीतून लेखन करतात. कल्पकतेला, स्वप्नरंजनाला तिथे मुळीच वाव नसतो. म्हणूनच पवार यांचे लेखन कृतिशीलतेला प्रेरणा देणारे ठरते.  



 दया पवार यांनी फिल्म्स डिव्हिजनच्या वतीने निघालेल्या डॉ.आंबेडकर यांच्यावरील चरित्रपटाचे पटकथा-लेखन केले. त्याचप्रमाणे ए.एन.डी.सी.च्या वतीने तयार करण्यात आलेल्या डॉ.आंबेडकरांवरील चित्रपटाच्या पटकथा लेखकांपैकी एक लेखक म्हणून पवारांनी काम पाहिले. त्यांना १९९० साली भारत सरकारचा ‘पद्मश्री’ हा मानाचा पुरस्कार लाभला तर १९८८ ते १९९६ या काळात बालभारती पाठ्यपुस्तक समितीचे सभासद म्हणून काम पाहिले. महाराष्ट्र राज्य नाट्य परीक्षण मंडळाचे अध्यक्षपद १९९३ साली लाभले.  ( संदर्भ - महाराष्ट्र नायक)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.