लेखिका - अनिता नायर
अनुवाद - अपर्णा वेलणकर
१९९८ पर्यंत रात्रभराचा प्रवास करणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये स्त्रियांसाठी स्वतंत्र ‘लेडीज कूपे’ असत. त्यानंतर मात्र रेल्वे प्रशासनाने ही स्वतंत्र व्यवस्था रद्दबातल ठरवली.
कन्याकुमारीला जातांना अखिलाच्या मैत्रिणीने अखिलासाठी लेडीज कुपेचं तिकीट मिळवलं होतं. अखिलाची चाळीशी उलटून गेली होती. तरीही घरातल्या जबाबदाऱ्या पूर्ण करतांना लग्न करायचं राहून गेलेली.
वडील गेले तेव्हा ती फक्त एकोणीसची होती. पदवीधर असल्याने वडीलांच्या जागेवर नौकरीला लागण्यास कोणतीही अडचण आली नाही. तेव्हाच घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या आपोआप तिच्यावर आल्या. दोन्ही लहान भावांची लग्न झालेली. धाकटी बहीण लग्नानंतर सासरी गेलेली. आता कोणतीही जबाबदारी शिल्लक नव्हती. तिला आता स्वतः साठी जगायचं होतं. हौसमौज करायची होती जी आतापर्यंत दडपून ठेवली होती. अधे मधे बंड करणाऱ्या शरीराच्या मागण्या पूर्ण करायच्या होत्या.
तरीही कोणताही निर्णय ती एकट्याने घेऊ शकत नव्हती. कारण ती पुरुष नव्हती. कन्याकुमारी ला जातांना मात्र तिने बंडखोरी केली. जाण्याच्या काही तास अगोदर तिने आईला सांगीतल्यावर नेहमीप्रमाणे आईने भावाची परवानगी घेतली का हे विचारल्यावर अखिला चिडली. त्यांना मी मोठं केलं, त्यांनी मला नाही. हे ऐकल्यावर आईने धुसफूस केली. अखिलाने आईकडे दुर्लक्ष करून बॅग भरली.
स्टेशनवर आल्यावर ती थोडीशी घाबरली. या अगोदर घर ते ऑफिस या व्यतिरिक्त ती कुठेही गेली नव्हती. गाडी आल्यावर लोटालोटी करीत ती कुपे पर्यंत पोहचवली.
अजून पाच जणी होत्या. वेगवेगळ्या वयोगटातल्या. वेगवेगळ्या स्तरातल्या. वय झालेल्या जानकीआज्जी, पतीला सोडून कधीच राहिल्या नव्हत्या. आजही रिझर्वेशन वेळेवर काढावं लागलं म्हणून त्यांच्या पतीला दुसरीकडे सीट मिळाली होती. प्रभादेवीच्या पतीचा ज्वेलरीचा बिझनेस होता. मार्गारेट ज्या शाळेत शिक्षिका होती, तिथे तिचा पती मुख्याध्यापक होता. कोपऱ्यात सगळ्यांपासून फटकून बसलेली ती वयाने लहान वाटत होती, पण चेहरा पार म्हातारा, सुरकुतलेला, भूतकाळाच्या जखमांनी बुजबुजलेला. ती या सगळ्यात वेगळी होती.
गाडी निघाल्यावर आपापसांत औपचारिक बोलाचाल होत राहीली. गाडीने जसजसा वेग घ्यायला सुरुवात केली तसतसा औपचारिकपणा गळून पडायला लागला. मनातलं ओठांवर यायला लागलं.
आणि समोर येतात वेगवेगळ्या स्रीयांच्या वेगवेगळ्या कहाण्या. एका वेली सारख्या पुरुषांच्या आधारावर जगणारी जानकीआज्जी, बंडखोरी करण्याचा प्रयत्न करून समाजाला घाबरणारी प्रभादेवी. पतीने केलेल्या दुराचारांचा बदला घेणारी मार्गारेट,
या सगळ्यामध्ये अखिलाचा एक प्रश्न, अत्यंत अस्वस्थ करणारा..
माझ्या दृष्टीने लग्न झालं नाही म्हणून फारसं काही बिघडत नाही. लग्नापेक्षा संवाद मैत्री महत्त्वाचे. पुरुषाचा सहवासही महत्त्वाचा, तो मला मिळाला तर हवा आहे. पण खरा प्रॉब्लेम तो नाही, मी एकटी राहते याचा बाकीच्या लोकांना जो त्रास होतो तोच खरा प्रॉब्लेम आहे. जरा संधी मिळाली की जो तो मला सुनावत असतो एकट्या बाईचं जगणं मुश्किल! कसं निभावणार तुझं...?
खरंच इतका अवघड आहे का बाईचं एकटीने जगणं तुम्हाला काय वाटतं. ..???