एका पानाची कहाणी

पुस्तकाचे नाव - एका पानाची कहाणी
लेखक - वि स खांडेकर




हे आत्मकथन आहे वि स खांडेकर ह्यांचे. बालपणापासून ते तारुण्यात थोडं स्थिरस्थावर होऊन लग्न होईपर्यंतचा जगण्याचा संघर्ष एका पानाची कहाणी सांगते. जे वाचतांना वाचक अनेकदा भावूक होतो. 


लहानपणी  वडील असे पर्यंत बरी असलेली आर्थिक परिस्थिती ते गेल्यावर हळूहळू ढासळत गेली. तेव्हा कोणत्याही नातेवाईकांनी मदत केली नाही. त्यात संसारापासून काहीशी अलिप्त असलेली आई. तिच्या भावना कधी उचंबळून आल्याच नाही. नाही म्हणायला आजोबांनी म्हणजे आईच्या वडीलांनी स्वतःची ओढग्रस्तीची परिस्थिती असूनही काही काळ राहण्याची खाण्यापिण्याची सोय केली. रडत खडत कसेतरी शिक्षण चालू राहिले. मॅट्रिकला शिष्यवृत्ती मिळाल्याने थोडासा आधार मिळाला. अशा नैराश्येत वाचनात मन रमू लागले. पुढे काॅलेजात गेल्यावर भरपूर वाचायला मिळाले. मग एखादी कविता, एखाद्या पुस्तकाचे समीक्षा लिहीत त्यांच्यातला लेखक अवतार घेऊ लागला. त्या लेखकाला वाढवण्यासाठी मदत झाली ती श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, आणि राम गणेश गडकरी ह्यांची. 

वडील गेल्यावर त्यांनी आपल्या काकांना आर्थिक मदतीसाठी पत्र लिहीलं होतं. त्या पत्राचं ना उत्तर आलं ना मदत मिळाली. पण नियती अशी विचित्र की पुढे याच काकांनी त्यांना दत्तक घेतलं आणि भविष्यातील आर्थिक परिस्थितीचा विचार करून ते ही दत्तक गेले. गणेश आत्माराम खांडेकर हे नाव बदलून विष्णू सखाराम खांडेकर असे झाले.  त्या काकांच्या १४ अपत्यांपैकी एकही अपत्य जिवंत नव्हते त्यातच त्यांची प्रकृती ढासळली होती. हे दत्तक विधान म्हणजे एक निव्वळ औपचारिक तडजोड होती. त्याच्यात कोणताही प्रेमाचा लवलेश नव्हता. 

मृत्यूसमयी पाणी द्यायला किंवा मेल्यावर श्राद्ध पक्ष करायला मुलगा हवा या कल्पनेच्या आहारी जाऊन ते दत्तक घ्यायला तयार झाले नव्हते. ढासळलेली प्रकृती सुधरत नव्हती म्हणून नानाविध प्रचलित, धार्मिक उपाय करण्यात आले. काय केले म्हणजे त्यांना बरे वाटेल अशा अर्थाचे कौल देवांना लावण्यात आले. अंगात येणाऱ्या गुरुवांनी सांगितलं की सखाराम बापूंचा आजार हा निसर्गाचा किंवा शरीर भोगाचा स्वाभाविक भाग नाही. हा आजार त्यांच्यावर लादण्यात आला आहे आणि लादणारी व्यक्ती पिशाच्च किंवा संमंध योनीतील आहे. आतापर्यंत तीनेच त्यांची सगळी मुले अकाली यमसदनाला पाठवली. या छळणाऱ्या पिशाच्चाला भक्ष्य असं काही राहिलं नाही म्हणून ते पिशाच्च आता सखाराम बापूच्याच बोकांडी बसलं आहे. त्याच्यापुढे दुसरं भक्ष्य उभं केलं तर आपोआप ते सखाराम बापूचा पिच्छा सोडेल. पिशाच्च्याच्या भक्ष्याची तजवीज म्हणून दत्तक घेणं ठरवलं गेलं होतं. 

हे समजले दत्तक विधान झाल्यानंतर. खाडेकरांचा भुताखेतांवर विश्वास नव्हता म्हणून त्यांनी फक्त कपाळाला हात लावला. त्यानंतर ते बासष्ट वर्षे जगले. 

 सहाजिकच या दत्तक पित्याने शिक्षणासाठी फारशी काही मदत केली नाही. ज्याची अपेक्षा होती. किंबहुना चुलत्यांच्या चांगल्या आर्थिक परिस्थितीमुळे आपल्या शिक्षणात काही अडचण येणार नाही हा अपेक्षाभंग मानसिक त्रास देणारा होता. अशातच प्रकृती वारंवार बिघडायला लागली. अंगात ताप भरला की पडून राहावं लागायचं. एका डाॅक्टरने क्षयाची शंका बोलून दाखवल्यावर खूप नैराश्य आलं होतं. कारण त्या काळी क्षयाचा रोगी क्वचितच वाचायचा. या तापाने अनेक वर्षे पिच्छा पुरवला. थोडीशी दगदग झाली की ताप यायचा. नंतर खांडेकरांनी तापाचा बाऊ करणं सोडून दिलं. एखाद दोन दिवस विश्रांती आणि औषधांनी आरोग्याची काळजी घेऊ लागले. 

कोकणातच एका शाळेत शिकवण्याची संधी मिळाल्यावर पुढे अनेक वर्ष त्या शाळेच्या वाढीसाठी तन-मन धनाने प्रयत्न केले स्वतःची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण असूनही काही हुशार विद्यार्थ्यांना जात-पात न बघता शिक्षणासाठी मदत केली. या शाळेत असतांनाच हळूहळू लेखक म्हणून नाव गाजायला सुरूवात झाली. कविता, निबंध, नाट्य, कादंबरी अशा सर्व प्रकारचे लेखन प्रसिद्ध होऊ लागले. शाळेच्या सुट्यांच्या कालावधीत पुण्यात यायचे तेव्हा अनेक प्रसिद्ध साहित्यिकांशी परिचय होऊ लागला. 

एका पानाची कहाणी ह्या आत्मकथनात खांडेकर त्यांच्या लग्ना पर्यंतची कहाणी सांगतात. तो पर्यंत ते पुर्ण प्रस्थापित झाले नव्हते. पुढे भविष्यात दत्तक पित्याशी संबंध कसे होते हा प्रश्न  अनुत्तरित राहतो. 

आपल्या साहित्यात मुक्तपणे अलंकारिक भाषा वापरणाऱ्या खांडेकरांनी आपल्या आत्मकथनातही अलंकारीक भाषेचा वापर केला आहे. 










Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.