कहाणी पहिल्या आगीनगाडीची

पुस्तकाचे नाव - कहाणी पहिल्या आगीनगाडीची
लेखक - राजेंद्र आकलेकर
अनुवाद - रोहन टिल्लू



आज सेंट्रल रेल्वे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वेचे जुने नाव द ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे व वेस्टर्न रेल्वेचे नाव द बॉम्बे बडोदा अँड सेंट्रल इंडिया असे होते. 

१८२५ मध्ये जगातील पहिली रेल्वे धावल्यानंतर १६ एप्रिल १८५३ या दिवशी भारतातीलच नव्हे तर अशियातील पहिली प्रवासी रेल्वे तीन इंजिन व चौदा डब्यांसह बोरीबंदर ते ठाणे या चौतीस किलोमीटरच्या मार्गावर धावली. सातासमुद्र पार सुरू असलेल्या औद्योगिक क्रांती बद्दल अनभिज्ञ असलेल्यांसाठी तर हे वाफ ओकणारं, धूर फेकणार आणि एवढे डबे खेचणारं इंजिन अजब असंच होतं. काहींचा तर एवढा ठाम विश्वास होता की या इंजिनाला कोणीतरी सैतान ताकत पुरवतो कोणत्याही दृश्य शक्तीच्या मदतीशिवाय हे इंजिन एवढ्या वेगाने कसं जाऊ शकतं नक्कीच यामागे कोणाचातरी हात आहे एक तर देवाचा किंवा सैतानाचा बहुत करून सैतानाचाच असा अनेकांचा दृढ विश्वास होता. लोक या गाडीला लोखंडी राक्षस म्हणायला लागले. 

या रेल्वेला धावतं करण्यासाठी कोणी किती परिश्रम घेतले, काय अडचणी आल्या, रेल्वेच्या बाबतीत सर्वसामान्य लोकांची काय समजूत होती याचा विस्तृत लेखाजोखा या पुस्तकात मिळतो. 

सह्याद्री पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेला खोपोलीपर्यंतचा ( त्या वेळचं कॅम्पोली ) हा रेल्वेमार्ग १८६१ पर्यंत दरवर्षी पावसाळ्यात वाहून जायचा आणि दरवर्षी नव्याने बांधायला लागायचा. मुंबई उपनगरी स्टेशनची नावे चौदाव्या शतकातील महिकावतीची बखर या ग्रंथातून घेतली आहेत,  लाहोर मुलतान दरम्यान रेल्वे मार्ग उभारणाऱ्या कंत्राटदाराने हडप्पा संस्कृतीच्या एका शहरातल्या जुन्या विटा रुळांमध्ये खडी टाकायला अजाणतेपणी वापरून टाकल्या, अशा मजेशीर माहितीसोबतच रेल्वेचं जाळं कसं विस्तारत गेलं. आज रेल्वे स्थानकांवर जुन्या काही खाणाखुणा आढळतात का याचाही आढावा घेतलेला आहे. या पुस्तकासाठी संशोधन करताना रेल्वेच्या इतिहासातला सर्वात जुना तुकडा कुठे सापडला असेल तर तो कोणाच्याही खिजगणितीत नसलेल्या जोगेश्वरी स्थानकात. हा तुकडा म्हणजे १८६८  सालची एक घंटा आहे. यावर BB&CIR Contract no 10.1868 असं लिहिलेलं आहे. स्टेशन मास्तरच्या ऑफीस बाहेर ही घंटा लटकवलेली आहे. 


रेल्वे मार्ग बांधतांना ब्रिटिश अधिकारी व हिंदुस्तानी मजूरांत होणारे गेरसमज, मजूरांनी अचानक काम थांबवून अधिकाऱ्यांच्या मनमानीला आवर घालणं. अशा अनेक छोट्या मोठ्या घटनांसह एका घाटमार्ग बांधणाऱ्या कंत्राटदाराचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पत्नीने हा मार्ग बांधून पूर्ण केला. अशा कधीही ऐकीवात न आलेल्या घटना विस्ताराने समजतात. नंतर विद्युतीकरण झाल्यावर एसी डिसीची अडचण, लोकल सुरू झाल्यावर त्यासाठी खास ब्रिटनहून आयात केलेलं सामान, प्रत्येक स्टेशन बांधतांना कसे आराखडे बनवले, बांधकामाचा कालावधी वगैरे बारीकसारीक तपशील गोळा करतांना लेखकाने घेतलेले परिश्रम जाणवतात. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.