लेखक - जाॅन ग्रिशॅम
अनुवाद - सुदर्शन आठवले
एकाहत्त्तर वर्षीय सेथ हबर्डने मृत्यूपत्र लिहून लगेच आत्महत्या केली. मृत्युपत्राद्वारे आपल्या संपत्तीतील नव्वद टक्के हिस्सा घरात काम करणाऱ्या कृष्णवर्णीय नोकराणीच्या नावे केल्यामुळे सगळ्या वारसांनी मिळून या मृत्युपत्राला कोर्टात आव्हान दिले.
सेथ हबर्ड कॅन्सरग्रस्त होते. डाॅक्टरांनी काही दिवसांचे सोबती असेच सांगीतले होते. आपले जीवन संपवण्याची एक आखीव रेखीव योजना बनवली होती. त्यांच्या नौकरासाठी लिहिलेल्या पत्रात सांगीतल्या ठिकाणी सिकॅमोर झाडाला लटकत असलेले त्यांचे प्रेत मिळाले होते. आपला अंत्यविधी कसा करायचा हे सविस्तरपणे लिहिलेलं दुसरं पत्र मिळालं.
जेक ब्रिगॅन्स या वकीलाला पोस्टाने सेथ हबर्डचे पत्र मिळाले. त्यात आपण आत्महत्या करीत असून सोबत दिलेल्या मृत्युपत्राची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी दिली होती. वास्तविक बघता जेक ब्रिगॅन्स व सेथ हबर्डची यापूर्वी कधीही गाठभेट झालेली नव्हती. तरीही त्यांच्या मते एक प्रामाणिकपणे वकीली व्यवसाय करणाऱ्या वकीलावर ही अवघड जबाबदारी सोपवतांना यात येणाऱ्या अडचणींचा उल्लेख करून कोणत्याही परिस्थितीत ही लढाई लढलीच पाहिजे. असेही पत्रात लिहिले होते.
सेथ हबर्ड यांचा अंत्यविधी झाल्यावर मृत्युपत्र उघड झाल्यानंतर आपल्याला काहीच मिळाले नाही म्हणून कुटुंबियांना आणि खुप काही मिळाले म्हणून लेटी लॅंग त्यांच्या कृष्णवर्णीय नोकराणीला जबरदस्त धक्का बसला. पाच टक्के हिस्सा चर्चला आणि राहिलेला पाच टक्के हिस्सा त्यांच्या लहान भावाला मिळणार जो सोळाव्या वर्षी घर सोडून गेला होता. त्यानंतर त्याच्याबद्दल कोणतीही माहिती नव्हती. तो जिवंत आहे की मृत हे सुद्धा माहित नव्हते. लहानपणी दोघानी
एक भयंकर कटू प्रसंग पाहीला होता. ज्यामुळे त्यांच्या भावाच्या मनावर परिणाम झाला होता. त्याची भरपाई म्हणून पाच टक्के हिस्सा देऊ केला होता.
सेथ हबर्ड च्या वारसांनी लगेच वकील नेमून कोर्टात खटला दाखल केला. जेक ब्रिगॅन्सच्या समोर अनेक आव्हाने होती. जेमतेम तीन वर्षे काम केलेल्या नौकराणीशी त्यांचे कसे संबंध होते की आपल्या संपत्तीचा नव्वद टक्के हिस्सा तिला देऊ केला होता. हे समजण्यासाठी तिच्या भुतकाळाचा शोध घ्यावा लागणार होता. याचसोबत लहानपणी असा कोणता कटू प्रसंग बघीतला ज्याने त्यांच्या भावाच्या मनावर परिणाम होवून तो बेपत्ता झाला होता..
कोर्टात खेळल्या जाणाऱ्या आडव्या तिडव्या चाली, शह प्रतिशह याचसोबत कोर्टाबाहेर घडणाऱ्या घटना वाचकांना जंजाळात ओढतात. अचानक येणारी अनपेक्षित वळणे गुंग करतात.
नेहमीप्रमाणे जाॅन ग्रिशॅम ची खिळवून ठेवणारी कादंबरी!