लेखक - बिमल मित्र
अनुवाद - ब्रिजमोहन हेडा
सव्वाशे दिडशे वर्षांपूर्वीचा काळाचा पट या कादंबरीतून अनुभवायला मिळतो. त्यावेळची जमीनदार सरंजामशाही, शोभेच्या पुतळ्या असलेल्या जमीनदार घराण्यातील सुना, रात्र घरात घालवण्यात कमीपणा समजणारे पुरुष. मालकाच्या शिव्या, मार खात इमानइतबाराने काम करणारे नौकर. जमीनदारांच्या मुलांना दारू, तंबाखू, नाचगाण्याचा शौक लावून पैसे हडपणारे, स्वार्थी संधीसाधू. अशा वेगवेगळ्या व्यक्तिरेखा या कथानकात भेटतात. या सगळ्यांसोबतच भेटतो खेड्यातून नौकरीच्या शोधात आलेला साधा भोळा भूतनाथ.
बडी हवेली, आपल्या श्रीमंतीत मग्न असलेली. कारकुनांवर व्यवहार सोपवून ख्याली खुषालीत रमलेले पुरुष. आणि त्यांचे दर्शन दुर्लभ झालेल्या त्यांच्या बायका, दिवसभर सागर गोटे, किंवा चौकड्यावर गोट्या फेकत मन रमवणाऱ्या, वाटेल तेव्हा दागीने घडवायचे, नाही आवडले तर मोडून नवे बनवायचे ह्यातच मश्गुल असलेल्या. छोटी बहू मात्र वेगळी होती. गरीब घरातून आलेल्या छोटी बहूला वाटायचं, पतीने आपल्या सोबत राहावं, बोलावं, सुख दु:ख वाटून घ्यावं. पण पती देवांना या कामी फुरसत मिळायची नाही. त्यांचा सगळा पुरुषार्थ नाचणारीनींच्या, रखेल्यांच्या माड्यांची शोभा वाढवण्यात जायचा. त्यातच त्यांना मोठेपणा वाटायचा.
एका सिंदुर बनवणाऱ्या कारखान्यात भुतनाथ कामाला लागल्यावर मालकांच्या मुलीसोबत जवामयी सोबत चांगली मैत्री जुळली. त्या कारखान्यातले सिंदूर छोट्या बहू ने भुतनाथ करवी मागवून घेतले. या अपेक्षेने की, या सिंदूरच्या जादूने आपल्या पतीचा सहवास मिळेल.
त्यानंतर या ना त्या कारणाने भुतनाथचा छोटी बहू शी स्नेह वाढत जातो, आणि एकदा छोटी बहू त्याला दारु आणायला सांगते. ती स्वतः पतीच्या सहवासासाठी पाजणार आणि स्वत: पिणार सध्दा होती. इथून सुरू होते तिची व्यसनाधीनता.
नंतर अशा काही घटना घडतात की, बडी हवेलीतील लोक आर्थिक संकटात पडतात. हळूहळू हवेलीची अधोगती सुरू होते. या गोष्टी सांभाळणं भुतनाथच्या आवाक्याबाहेर असते. त्याला काळजी असते ती छोटी बहूची.
सिंदूरचा कारखाना बंद केल्यावर तिथले मालक भुतनाथला एका काँट्रॅक्टरकडे कामाला लावून दिल्यावर त्याचं हवेलीत जाणं येणं कमी होतं. नोकरीनिमित्त काही दिवसांसाठी बाहेरगावी जावं लागतं.
आणि एक दिवस कर्ज चुकवलं नाही म्हणून हवेलीवर जप्ती येते.
अशी वेगवेगळी वळणं घेत कथानक वाचकाला बांधून ठेवते.
अधे मधे क्रांतिकारकांचा उल्लेख येतो. इंग्रज अधिकाऱ्यांची अरेरावी, त्याला क्रांतीकारकांनी दिलेलं उत्तर, बंगालची फाळणी, क्रांतीकारकांना मदत करणारी, आणि प्रसंगी त्यांना धोका देणारी माणसेही समयोचितपणे भेटतात.
भुतनाथ छोटी बहूला भेटायला हवेलीत जातो पण ती भेटत नाही. नंतर कधीच भेटत नाही. ती कुठे गेली हे ही समजत नाही.
सिंदूर कारखान्याच्या मालकांनी त्यांच्या मुलीच्या जवामयीच्या जन्मा अगोदर ब्रह्मोसमाज स्वीकारल्यामुळे त्यांच्या दोन महिन्याच्या जवामयीला पळवणारे आणि तिचं लग्न लावून देणारे तिचे आजोबा. मरतांना हे सांगीतल्यामुळे जवामयी ठरलेल्या लग्नाला नकार देते. तो पती जीवंत असेल तर हे लग्न म्हणजे पाप असेल असे म्हणून भुतनाथला पतीचा शोध घ्यायला सांगते. तिथेही वाचकांना आश्चर्यकारक धक्का बसतो.
तसाच धक्का बसतो जेव्हा बडी हवेली पाडली जात असताना तिथे जे काही सापडते त्यामुळे.
या कादंबरीतील छोटी बहू आणि भूतनाथ ही पात्रे सदैव लक्षात राहण्यासारखी आहेत. स्त्री-पुरुषांकरिता वेगवेगळे नैतिक मापदंड, कबुतर उडवण्याचा शौक असलेले बडे बाबू, विलासी जीवनात रंगलेले छोटेबाबू आणि या घराच्या एका युगाच्या अंताचा साक्षीदार भूतनाथ ही प्रमुख पात्रे तर आपल्या मनात घर करून जातातच; परंतु लेखकाने या कादंबरीतील गौण पात्रेही अतिशय जिवंत केली आहेत, ती आपल्या मनात घर केल्याशिवाय राहत नाहीत.
या कथानकावर आधारीत याच नावाने प्रदर्शित चित्रपटात जवा, छोटी बहू आणि भुतनाथ या व्यक्तिरेखांना प्राधान्य दिले आहे. परंतु कादबरीचा पट त्यापेक्षा कितीतरी मोठा आहे.