लेखक ना. स. इनामदार
पानिपत ही मराठेशाहीच्या इतिहासातील एक भळभळती जखम आहे. दोन मोती गळाले, २७ मोहोरा गमावल्या, चांदी व तांब्याची नाणी किती गेली याची गणतीच नाही.
पनिपत युध्दातील पराभवाने खचलेल्या नानासाहेब पेशव्यांच्या मृत्यूनंतर माधवराव पेशवे सत्तेत आले होते. त्यांच्या मातोश्री गोपिकाबाई नाशकात राहून राज्यकारभारावर लक्ष ठेवून होत्या. त्यांच्यानंतर शनिवार वाड्यात पार्वतीबाई जेष्ठ होत्या. त्यांना मातोश्रीच्या ठिकाणी समजून माधवराव पेशवे त्यांना मान देत होते.
सदाशिवभाऊंचा देह न सापडल्यामुळे आज न उद्या ते येतील या आशेवर पार्वतीबाई आयुष्य कंठीत राहील्या. त्यांच्या बाबतीत अनेक उडत्या खबरा येत होत्या. अमुक ठिकाणी दिसले, तमुक ठिकाणी दिसले, पंजाबात गेले, सन्यास घेतला, अशा अनेक उडत्या खबरा येत होत्या. आणि खरोखरच सदाशिवभाऊ महाराष्ट्रात आले.
जनकोजी शिंदेच्या तोतयाचा बंदोबस्त केल्यावर सदाशिवभाऊंच्या तोतयाची खोलवर चौकशी केली तेव्हा तो कन्नोज ब्राह्मण असल्याचे सिद्ध झाले. दोघांमध्ये असलेल्या साम्याचा फायदा घेण्याचं षडयंत्र कोसळून पडले असले तरी पुण्यातील अनेक मातब्बर दबक्या आवाजात तो तोतया नसल्याच्या पैजा लावत होते.
़
पार्वतीबाईंनी भाऊंच्या तोतयाला स्वतः भेटून खात्री करून घेण्याची पेशव्यांना विनंती केली. ती नाकारण्यात आली. काही सरदारांनी पार्वतीबाईंच्या मनात विष कालवण्याचाही प्रयत्न केला. सत्ता जाण्याच्या भितीपायी माधवराव पेशवे भाऊंना ओळख देत नाही.
पुढे क्षयाने माधवराव पेशव्याची प्रकृती उतरणीला लागून त्यांचा अंत झाला. रमाबाई सती गेल्या. नारायणराव पेशवेपदी बसल्याचे लोभी सत्तालोलूप रघुनाथदादांना सहन न झाल्याने कपटाने गारद्यांकरवी नारायणरावांचा खुन करवला. स्वतः पेशवेपदावर बसले. रामशास्त्रींनी रघुनाथदादांना दोषी ठरवल्यावर ते इंग्रजांच्या आश्रयाला गेले. आता बारभाई कारस्थान आकार घेऊ लागले. नाना फडणीसांनी सत्ता हाती घेतली. गंगाबाईच्या पोटी जन्म घेतलेल्या सवाई माधवराव वयाच्या चाळीसाव्या दिवशी पेशवे पदी बसले.
या सगळ्या नाटकीय घडामोडी पार्वतीबाईंच्या देखत घडत होत्या. पती गेल्यावर अहेवपण न सोडणाऱ्या पार्वतीबाईंमुळे अशी संकटे येताहेत. सदाशिव भाऊंचा मृत्यू स्विकारून त्यांनी कमीतकमी केशवपण तरी करावे असे नाना फडणवीस अनेकांकरवी सुचवीत होते. अनेक बाजूंनी पार्वतीबाईंची घुसमट होत होती.
तरीही त्या पतीची वाट बघत राहील्या. युध्दानंतर तब्बल दोन दशके.
ऐतिहासिक कादंबरी रेखाटतांना कल्पना स्वातंत्र्य घेतले जाते हे लक्षात ठेऊनही ना. स. इनामदारांनी पार्वतीबाईंचे पात्र व इतरही व्यक्तिरेखा अत्यंत ताकदीने उभ्या केल्या असून पेशवाईचा कालखंड सजीव केला आहे.