(२७ जानेवारी १९०१ - २७ मे १९९४)
महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत, संस्कृत पंडित व मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक. १९२३ साली कलकत्त्याच्या शासकीय संस्कृत महाविद्यालयातून ‘तर्कतीर्थ’ पदवी त्यांनी संपादन केली.शास्त्रीजींची ग्रंथसंपदा मोजकी पण मौलिक आहे. शुध्दिसर्वस्वम् (१९३४), आनंदमीमांसा (१९३८), हिंदुधर्माची समीक्षा (नागपूर विद्यापीठात रा. ब. परांजपे व्याख्यानमालेत दिलेली तीन व्याख्याने, १९४१), जडवाद (१९४१),ज्योतिनिबंध (म. फुल्यांचे चरित्र आणि कार्य– १९४७), वैदिक संस्कृतीचा विकास (१९५१, द्वितीय आवृ. १९७४), आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा व रससिद्धांत (१९७३) हे त्यांचे ग्रंथ मान्यता पावले आहेत. राजवाडे लेखसंग्रह (१९६४) आणि लो. टिळक लेखसंग्रह (१९६९) हे त्यांनी संपादिलेले उल्लेखनीय ग्रंथ. यांशिवाय अनेक लेख व प्रस्तावना त्यांनी लिहिलेल्या आहेत. हिंदुधर्माची समीक्षा ऐतिहासिक व समाजशास्त्रीय पद्धतीने त्यांनी केली आहे. ‘धर्मसमीक्षा हीच सर्व प्रकारच्या समीक्षेची जननी आहे’ या कार्ल मार्क्सच्या तत्त्वाचा पुरस्कार त्यांनी या ग्रंथात केला आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाचे सुरुवातीपासून म्हणजे १९६० पासून शास्त्रीजी अध्यक्ष होते. मंडळातर्फे भाषा-साहित्यविषयक अनेक योजना कार्यान्वित झालेल्या आहेत. त्यांपैकी प्रमुख प्रकल्प वीस खंडीय मराठी विश्वकोशाचा आहे. प्राचीन-अर्वाचीन सर्व ज्ञानविज्ञाने मराठीतून विशद करण्याचे हे मौलिक कार्य शास्त्रीजींच्या मार्गदर्शनाखाली झाले. १९५४ दिल्ली येथील साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष पद 'संस्कृत पंडित' ( १९७३), ‘पद्मभूषण’ (१९७६) , पद्मविभूषण( १९९२ ) पुरस्काराने भारत सरकारने त्यांना गौरविले. ( संदर्भ - मराठी विश्वकोश)