लेखिका - स्वाती चांदोरकर
वर्षातले त्या ठराविक दोन दिवसात देशप्रेम उफाळून येतं त्यावेळी सैनिकांबद्दल त्यातूनही शहिद झालेल्या व कामगिरी फत्ते करून आलेल्या सैनिकांबद्दल अत्यंत कौतुक वाटतं
परंतु जे जवान सैनिक कामगिरी फत्ते करतांना जबर जखमी होऊन मृत्यू आला नाही म्हणून लोळागोळा झालेल्या शरीराला सांभाळत असतात, त्यांच्याविषयी सर्वसामान्य लोकांना फार कमी माहिती असते. काहींचे हात, काहींचे पाय गेलेले. तर काहींचे शरीर कमरेखाली लुळे पडलेले..सगळे आयुष्य समोर उभे असतांना भर तारूण्यात अशा विकलांग झालेल्या सैनिकांची मानसिकतेची जाणीव सर्व सामान्यांना नसते.
कधी वर्तमानपत्रांतून अथवा बातम्यांमधून काही माहिती मिळते सैनिकांबद्दल, वाचतो आणि विसरतो. आपल्या दैनंदिन जीवनात त्यांचा वाटा तितकाच.
या कथानकातून त्यांचे जगणे उलगडत जाते.
पुण्याजवळ खडकीला ‘पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटर’ आहे. इथे जखमी होऊन आयुष्यभरासाठी विकलांग सैनिकांची देखभाल केली जाते. अपंगत्व घेऊन ते त्यांचं जीवन जगत आहेत. त्यांच्या परीनं आनंदात आहेत. भेटायला येणार्या पाहुण्यांना ते जाणवून देतात की, आम्ही हरलेलो नाही. आमची कीव करू नका. आम्ही आजही कार्यरत आहोत!
नायक सुरेश कार्की. छातीपासून खालचं शरीर अपंग आहे. काही जाणीवच नाही त्या शरीराला; पण नायक सुरेश कार्की उत्तम बॅडमिंटनपटू आहेत. त्यांनी अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. ते बास्केटबॉल खेळतात, टीमचे कॅप्टन होते. नायक मृदुल घोष, मानेपासून खालचं शरीर अपंग. तोंडात ब्रश धरून चित्रं काढणारा अवलिया. माउथ पेन्टर म्हणून नावजलेलं व्यक्तिमत्त्व. आपल्या भावना काव्यातून व्यक्त करणारा सैनिक.
अशा विकलांग सैनिकांच्या मनात मरणाचा विचार अनेकदा येऊन गेला असणार, कोणी बोलून दाखवत नाही कारण हा या सेंटरचा अलिखित नियम आहे की कोणीही निगेटिव्ह काहीही बोलायचं नाही तसा काही विचार आला तर सर्वधर्मस्थळात जाऊन बसायचं. इथे एकाच ठिकाणी सर्व धर्माचे अनुयायी कोणत्याही भेदभावाशिवाय प्रार्थना करू शकतात. सैनिकांनी आपल्या देवाची प्रार्थना करायची. लढण्याची ताकद मागायची. मनातली निराशा आपोआप झटकली जाते.
रिहॅबिलिटेशन सेंटर च्या नुतनीकरणाचे काम करणाऱ्या क्षितिज आणि शेफालीला सर्वसामान्य विकलांग रुग्णांसाठी अशा प्रकारचे सेंटर उभारण्याची प्रेरणा मिळते.
हे सगळं कादंबरीतून स्वाती चांदोरकरांनी इतक्या उत्कटतेनं रेखाटलं आहे की या विकलांग सैनिकांची तीव्र जीवनेच्छा बघून आपणही प्रार्थना करू लागतो. यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, अपघात कसा झाला, सुरूवातीला भावनेच्या भरात रोग्याची त्याच्या घरी काळजी घेतली जाते. मात्र नंतर हा आयुष्यात असाच राहणार ही जाणीव हळूहळू रुग्णाकडे दुर्लक्ष करण्यास भाग पाडते, आणि रुग्णाची मानसिकता कोलमडायला लागते. अशा रुग्णांना मानसिक आधार देऊन त्याला काय करता येईल ते करायला देऊन त्याच्यातली जीवनेच्छा वाढवणे हे काम या रिहॅबिलिटेशन सेंटर मध्ये कशा पध्दतीने केलं जातं. याचं सुंदर चित्रण केलं आहे.
तिरकी चाकं असलेल्या व्हीलचेअर्स, पाय, छाती, मांड्या बेल्टने व्हीलचेअरला बांधलेल्या, झरझर चाकांवरून फिरणारे हात, त्याचवेळी बॉल धरायला सरसावणारे हात... डोळ्यांचं पातं लवेलवेपर्यंत बॉल एकाच्या हातातून दुसर्याच्या हातात, जोरात पळणार्या व्हीलचेअर्स, नेटच्या जवळजवळ जाणार्या, मागे-पुढे होणार्या... आणि....गोलऽऽऽचा गलका..सगळ्यांचाच उत्साह कसा ओलांडून जात असतो.....
सोल्जर्स आत्महत्या करत नाही, विकलांगतेवर मात करीत जगतात, आणि जगावं कसं हे सामान्य धडधाकट माणसांना शिकवतात. हे शिकण्यासाठीच या सेंटरला भेट द्यावी.