अंगावर धड कपडे नसलेली, जखमा वागवणारी, झिपर्या केसांची असंख्य मुलं आपण रोज बघत असतो. रेल्वे स्टेशनाच्या परिसरात, प्लॅटफॉर्मावर किंवा कुठेतरी वळचणीवर आपलं बेवारस आयुष्य जगणार्या मुलांचं जीवन रुळांवरून पुरतं घसरलेलं असतं. काही ना काही कारणांमुळे घर सोडून आलेली ही मुलं रेल्वे स्टेशनावरच्या गर्दीत आसरा शोधतात. आपलं आयुष्य सावरण्याचा प्रयत्न करतात. पण तिथल्या उघड्यावाघड्या जगण्यामुळे त्यांना आयुष्यभराच्या सर्व बर्यावाईट प्रसंगांना लहानपणीच सामोरं जावं लागतं. ही मुलं आपलं बालपण फार लवकर हरवून बसतात.
आजूबाजूचे मोठे या मुलांचा वापर करून घेतात. ओझी उचलायला, भीक मागायला, रेल्वेखाली कोणी आलं, तर तो छिन्नविछिन्न मृतदेह उचलायला, लैंगिक भूक भागवायला ही मुलं फारच सोयीची असतात. पोटासाठी सहन करावे लागणारे अत्याचार, आणि दु:ख विसरण्यासाठी फार लवकर जवळ केलेली व्यसनं यांमुळे या मुलांची परवड काही केल्या थांबत नाही. काही सामाजिक संस्था स्टेशनावरच्या मुलांना एक सुरक्षित आयुष्य देण्यासाठी प्रयत्न करतातही.
वडिलांच्या पश्चात मोलमजुरी करून घर चालवणारी आई, मुलीला दवाखान्यात ऍडमिट केल्यावरही वडिलांचे पैसे बळकावलेल्या आत्याने उपचारांसाठी पैसे दिले नाही म्हणून तिचे पैसे चोरून दवाखान्यात भरणारा अँथनी. पुढे होणाऱ्या परिणामांना घाबरून घरातून पळून गेला. रेल्वे स्टेशन रामसरण चाचाचा माल विकायचा. कधी भिक मागीतली नाही की कोणाला फसवलं नाही. खुप पैसे कमवून घरी जाण्याचे स्वप्न बाळगणारा.
कमरेखालचं लुळं शरीर घसरवत हाताच्या आधाराने खरडत भिक मागणारा केक्या. बापानेच त्याच्या अपंग शरीराचं भांडवल करून भिक मागायला शिकवलं होतं. पैसे कमी मिळाले की बाप झोडपायचा. बाप दारुच्या नशेत असतांना पळून गेला.
झहीर पाच वर्षांचा असतांना साथीच्या आजारात आई बाप गेल्याने एकटा पडला. मोठी बहीण त्याला घेऊन गेली परंतु जिजाच्या त्रासाला कंटाळून घर सोडून गेला.
एकंदरीत नऊ मुलांच्या प्रातिनिधिक कथा मनावर ओरखडे काढतात. चोऱ्यामाऱ्या, फसवणूक करीत जगणाऱ्या या मुलांमध्ये अशा वातावरणात ही व्यसनांपासून दुर असणारी, मेहनतीच्या जोरावर पोट भरणारीही तुरळक मुले आढळतात.
अशा वेगवेगळ्या कारणाने घर सोडणारी मुले स्टेशनवर येतात. इथे सगळ्या प्रकारचे अनुभव पचवून एकमेकांच्या सोबतीने अनेक संकटांचा सामना करतात. यातलं सगळ्यात मोठं संकट म्हणजे पोलीस. रात्री अपरात्री येऊन मारहाण करणार, अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची प्रेते उचलायला लावणार. मोठ्या साहेबांच्या बंगल्यावरची काम फुकट करून घेणार. कधी कधी तर खिशातले पैसेही काढून घेणार. ही मुले म्हणजे शहाण्यासुरत्या समजल्या जाणाऱ्या आपल्यासारख्या लोकांनी नजरेसमोर दिसत असूनही मनाच्या आणि बुद्धीच्या आड केलेलं एक रखरखीत वास्तव आहे.
स्टेशन वरील प्लॅटफॉर्म एक नंबर पासून सुरू होतात. तिथे झिरो नंबरचा प्लॅटफॉर्म अस्तित्वातच नसतो. परंतु या मुलांचं आयुष्य इथे शून्यातूनच सुरू होतं आणि बहुतेकदा तर शून्यातच भिरकावला जातं म्हणून या पुस्तकाचं नाव आहे प्लॅटफॉर्म नंबर झिरो.