पुस्तकाचे नाव - नेल्सन मंडेला
लेखक - अतूल कहाते
आपण सगळे अत्यंत निषेधार्ह घटनांच्या इतिहासाला माफ करू शकतो; पण तो विसरू शकत नाही’, - नेल्सन मंडेला.
कृष्णवर्णीय लोक, तसंच मिश्रवर्णीय लोक जन्मानंच दुय्यम दर्जाचे असतात, असं ठरवून गोर्या लोकांनी आपली भरभराट होईल आणि आपल्या कल्याणासाठी हे कृष्णवर्णीय लोक राबतील, यासाठीची व्यवस्था करून ठेवली होती. अर्थातच युरोपीय देश, तसंच अमेरिका यांचा या वर्णद्वेषी धोरणांना कधी उघड आणि बरेचदा छुपा पाठिंबा होता. अशा विलक्षण कठीण परिस्थितीमध्ये नेल्सन मंडेला या युगपुरुषानं ज्या जिद्दीनं दक्षिण आफ्रिकेमध्ये समान नागरी कायदा यावा; म्हणून प्रयत्न केले, त्याला तोड नाही. तब्बल २७ वर्षं तुरुंगात काढूनही ह्या माणसाची उमेद हरली नाही. सुरुवातीला भडक माथ्याचा आणि काही काळ हिंसक कृत्यांचं समर्थन करणारे मंडेला नंतर कसे बदलत गेले, याची कहाणी थक्क करून सोडणारी आहे. ज्या लोकांनी आपल्या आयुष्याचं जवळपास मातेरं केलं; ज्यांनी आपल्याला तुरुंगाबाहेरचं जग आपल्या ऐन उमेदीच्या काळात बघूसुद्धा दिलं नाही, त्या सगळ्या लोकांविषयी मनात कसलाही राग न बाळगणारा आणि म्हणूनच त्यांचा सूड घ्यायची भावना न बाळगणारा हा माणूस अलौकिकच आहे! कुठल्याही सर्वसामान्य माणसानं अशा परिस्थितीत अत्यंत खुनशीपणे आपल्या विरोधकांचा बदला घेण्यासाठी कंबर कसली असती. तब्बल २७ वर्षं आपल्या कुटुंबाशी, आपल्या जवळच्या लोकांशी, आपल्या देशवासीयांशी नावापुरताच संपर्क राहिलेला असूनसुद्धा, या काळात आपल्या कुटुंबाचे तीनतेरा वाजलेले असूनसुद्धा, तुरुंगाबाहेर आल्यावरही अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागूनसुद्धा मंडेलानं आपला संयम ढळू दिला नाही. गांधीजींना आदर्श मानणाऱ्या नेल्सन मंडेला यांनाही नमस्कार करावासा वाटतो.
मंडेलांनी कृष्णवर्णीय लोकांची चळवळ यशस्वी केली यात शंकाच नाही. कित्येक शतकांपासून गोर्या लोकांचं दक्षिण आफ्रिकेवर असलेलं अन्यायी वर्चस्व संपुष्टात आणण्यात त्यांनी विलक्षण मोठा हातभार लावला, याविषयीसुद्धा वादच नाही. पण, त्याहून सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं करत असताना आपल्या तत्त्वांना मुरड न घालता अत्यंत साधेपणानं माणसानं माणसाशी कसं वागायचं, याचा आदर्श सादर केला, म्हणून नेल्सन मंडेलांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे.
दक्षिण आफ्रिकेमधला वर्णद्वेष संपवण्यामागे मंडेलांची भूमिका अर्थातच निर्णायक होती, पण मुळात आपण हे सगळं करू शकू यासाठीचा दांडगा आत्मविश्वास त्यांच्यापाशी होता; म्हणूनच हे शक्य झालं.
मंडेलांची तुरुंगातून झालेली सुटका हा दक्षिण आफ्रिकेच्या वर्णद्वेषी इतिहासामधला अत्यंत महत्त्वाचा क्षण होता. ज्या माणसावर तर्हेतर्हेचे आरोप ठेवून आणि खूप अन्याय करून सरकारनं त्याला तुरुंगात डांबलं होतं, त्यालाच मानानं मुक्त करायची वेळ सरकारवर आली होती. पण, आपली सुटका झाल्यामुळे वर्णद्वेष संपला, असं मानण्याइतका मंडेला दुधखुळा नव्हते. कृष्णवर्णीय लोकांना खर्या अर्थानं सगळे हक्क गोर्या लोकांसारखे समान पातळीवर मिळणार नाहीत, तोपर्यंत आपल्या सुटकेला काही अर्थ नाही; अशी त्यांची धारणा होती. साहजिकच, आता वर्णद्वेष पूर्णपणे संपवण्याचं स्वप्न मंडेलांनी मनाशी बाळगलं होतं.
१० मे १९९४ या दिवशी मंडेलानं अधिकृतपणे राष्ट्रपतीपदाची सूत्रं हाती घेतली. आपल्या भाषणात ‘कल्पनेपलीकडच्या भीषण परिस्थितीनंतर आता सगळ्या जगाला अभिमान वाटेल असा समाज आपण मिळून घडवू या!’, असं आवाहन आपल्या देशवासियांना केलं. त्याचबरोबर या सुंदर देशात इथून पुढे ठरावीक प्रकारचे लोक इतर सगळ्या लोकांवर आपली सत्ता गाजवत असल्याचं दृश्यही कधीच बघायला मिळणार नाही, असा विश्वास मंडेलांनी व्यक्त केला.
नेल्सन मंडेला ह्यांचा हा सगळा राजकीय जीवन प्रवास, कौटुंबिक सुख दु:ख अतूल कहाते ह्यांनी ओघवत्या शैलीत शब्दबद्ध केला आहे.