लेखक - डॉ. मनोहर नरांजे
मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी आरोग्य सेवा देणाऱ्या व समाजसेवा करणाऱ्या डा रवींद्र कोल्हे व त्यांच्या पत्नी स्मिताची संघर्षगाथा. त्यांना २०१९ साली सरकारतर्फे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बैरागड हे अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील एक गाव. दिड दोन हजार लोकवस्ती, पावसाळ्यात सबंध जगाशी संपर्क तुटायचा. जीवनावश्यक वस्तूंची बेगमी करूनच पावसाळा कंठावा लागे. एखादी वस्तू मधेच संपली तर पावसाळा संपून रस्ते खुले होइपर्यंत मिळण्याची शक्यताच नसे. शिवाय सोबतीला वन व्याप्त प्रदेशाची दुर्गमता होती. एस टी ची सोय नसल्यामुळे संपर्कासाठी खाजगी वाहनांचाच वापर करावा लागे.
एम बी बी एस झालेल्या डॉ. रवींद्र कोल्हे ह्यांनी या गावाला आपली कर्मभूमी बनवून एका रिकाम्या पडलेल्या गोठ्यात दवाखाना थाटला. तपासणी फी होती एक रुपया.
त्याच्यामध्ये प्रवाहित असलेल्या माणुसकीचा अखंड स्रोत गावकऱ्यांच्या नजरेस पडला आणि केवळ वैरागडवासियाच नव्हे तर पंचक्रोशीतील अनेक गावे या तरुण डॉक्टर कडे विश्वासाने पाहू लागली. बैरागड ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन गावालगतची मोकळी दोन एकराची जागा त्यास घर व दवाखान्यासाठी नावे करून दिली शिवाय सहा खोल्यांचे कौलारू घरही बांधून दिले.
आदिवासींचा मुख्य प्रश्न आरोग्याचा नाही. तो आहे भुकेचा, कुपोषण म्हणून आपण कंठघोष करतो, परंतु ते केवळ कुपोषण नसून अनेक ठिकाणी ती उपासमारच असते. हे अभ्यासाअंती लक्षात आलं. आणि त्या दिशेने प्रयत्न सुरू झाले.
खरं तर या माणसाचं जीवंत राहणच एक आश्चर्य होतं. अगदी लहानपणीच अत्यंत दुर्मिळ अशा हृदयरोगचं निदान झालं होतं रुग्ण साधारणपणे तीन ते पाच वर्षात दगावतातच असा इतिहास. परंतु योग्य उपचाराने किंवा नशीबाने बाळ मोठं झालं. डाॅक्टर होऊन मेळघाटातील आरोग्य सेवा विकसित करुन बालमृत्यूचे प्रमाण कमी केले,
आपल्या कार्यास मदत होईल अशी पत्नी शोधण्यासाठी त्यांनी जगावेगळ्या अटी टाकल्या. त्या मान्य करून अर्धांगिनी बनलेल्या स्मिताने तर बैरागड मधल्या अनेक समस्यांचा आणि संकटांचाही सामना केला. अनेकदा धोरणात्मक निर्णय घेऊन लढ्याचे रणशिंग फुंकायचे ते रवीने आणि तो लढा शेवटच न्यायचा तो स्मिताने असे जणू ठरलेलेच असायचे. हा लढा लढत असताना दोनदा ती तुरुंगत जाऊन आली एकदा हात मोडून घेतला पोलीस स्टेशनच्या वाऱ्या तर नेहमीच्याच असायच्या शिव्या शाप तर ती नेहमीच घेते आणि देते सुद्धा. प्रसंगी हात घाईच्या लढाईत मारामारीलाही कमी पडत नाही. दोन वेळा निवडणूक लढवून ग्रामपंचायत सदस्य सुध्दा बनली.
डॉ. रवीच्या साथीला वैरागड मध्ये स्मिता नसती तर कदाचित त्यांचे कार्य रुग्णसेवेपुरतेच मर्यादित राहिले असते आणि स्मिताच्या आगमनानंतर झालेली संघर्ष यात्राही कदाचित त्यांच्या वाट्याला आली नसती. धर्म परिवर्तनास विरोध, मुलींच्या लैंगिक शोषणाविरुद्धचा लढा, चोरटी शिकार, बळी प्रथेविरुद्धचा संघर्ष यासारख्या लढ्यात ते कदाचित पडले नसते. परंतु स्मिताच्या आग्रही प्रतिपादनामुळे त्यांना या मुद्द्याचे महत्त्व पटले आणि लढले सुध्दा. एकदा लढाई सुरू केल्यावर मात्र माघार घेतली नाही. काही वेळा त्यांच्यवर हल्ले झाले. घर, शेती जाळण्याचा प्रयत्न झाला. तरीही बैरागड सोडलं नाही. ते बैरागडात राहतात, नव्हे बैरागड जगतात. त्यांचे थोरले चिरंजीव शेती करतात. धाकटे चिरंजीव डाॅक्टर बनण्याच्या मार्गावर आहेत.
समाजसेवेचं व्रत घेतलेलं हे अवलिया कुटुंब. पद्मश्री ने सन्मानित.!