पुस्तकाचे नाव - द कॉल ऑफ द वाइल्ड
लेखक - जॅक लंडन
अनुवाद - माधव जोशी.
युकॉनच्या बर्फमय प्रदेशातल्या बक नावाच्या एका श्वानाची त्याच्याच दृष्टिकोनातून सांगितलेली " वर्ल्ड क्लासिक " कहाणी आहे.
मिलर साहेबांची वाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका भल्या मोठ्या घरातला पाळीव कुत्रा असलेला बक. तो मिलर साहेबांच्या मुलांबरोबर शिकारीला जायचा, मिलर साहेबांच्या मुली फेरफटका मारायला जायच्या तेव्हा त्यांना सोबत करायचा, तर कधी हिवाळ्यातल्या थंडगार रात्री वाचनकक्षातल्या शेकोटी समोर मिलर साहेबांच्या पायाशी पडून राहायचा. मिलर साहेबांच्या घरातला एक महत्त्वाचा सदस्य होता तो.
बर्नार्ड आणि शेफर्ड या मिश्रकुळाचा बक केसाळ धिप्पाड असल्यामुळे अडचणीत आला. ध्रुवीय प्रदेशात सोन्याच्या शोधार्थ जाणाऱ्या लोकांना स्लेज ओढण्यासाठीपण अशाच कुत्र्यांची गरज होती.उमरावाच्या घरात माणसाळलेल्या बकला नौकराने पैशासाठी विकल्यावर बकची रवानगी झाली स्लेज ओढण्यासाठी. खरं तर तिथपर्यंत पोहोचण्याच्या प्रत्येक टप्प्यावर बकने स्वत:ची सुटका करण्याची धडपड केली होती. मात्र त्याला यश मिळालं नव्हतं.
मग सूरु होते वर्चस्व गाजवण्याची धडपड. जर तुम्ही दुबळे असाल तर तुम्हाला जगण्याचा हक्क नाकारला जातो. वर्चस्व गाजवणं म्हणजे जगण्याचा अधिकार सिध्द करणं असतं.
एकीकडे हिंसक आणि निष्ठुर जगाचं वर्णन करणारी ही कथा दुसरीकडे माणसाच्या आणि प्राण्याच्या नात्याविषयी सांगितलेली एक हळुवार साहसकथाही आहे. आपले मित्र कोण आहे, शत्रू कोण आहे, आपण कोणावर प्रेम करावं, हे मुक्या प्राण्यांना बरोबर समजतं. म्हणूनच बर्फाळ प्रदेशात जखमी झाल्यामुळे स्लेज ओढायला कुचकामी ठरल्यावर बकला मरण्यासाठी सोडून दिले होते. छोटसं हाॅटेल चालवणाऱ्या थाॅरटनने बकला उचलून आणलं, औषधोपचार केला. मरणाच्या दारातून परत आणलं होतं. त्याच्यावर प्रेम करणाऱ्या, आपल्या ताटातलं अन्न बकला देणारा थाॅरटन तलावात बुडायला लागला तेव्हा बकने त्याला वाचवलं होत़ होतं.
नंतर मात्र बक हिंस्रतेकडे वळू लागला. जंगलातून साद घालणाऱ्या हाकांना प्रतिसाद देऊ लागला होता.
सुसंस्कृतपणाकडून आदिम हिंस्रपणाकडे बकने केलेल्या प्रवासाचा हा लेखाजोखा आहे. पण या श्वानाच्या रोमांचक कथेतून आपल्यासमोर एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी सोन्याच्या हव्यासाने कॅनडामधल्या क्लोंडाईक प्रातांत गोळा झालेल्या लोकांचं जग उभं राहतं.
लेखकाने स्वतःसुद्धा अलास्कामधे सोनं शोधण्यासाठी वर्षभर भटकंती केली होती. त्यामुळे घडणाऱ्या घटना वास्तवतेशी जवळीक साधतात.