स्त्री-जीवनातील समस्या, तिची दुःखे मांडणार्या आद्य गद्य लेखिकांपैकी एक होत्या. विवाहानंतर त्या मराठी भाषा शिकल्या व मराठीत त्यांनी प्राविण्य संपादन केले. घरच्यांनी गिरीजाबाईंच्या लेखनाला प्रोत्साहन दिल्यामुळे त्या लिहू लागल्या. त्यांनी विपुल व विविध लेखन करून चांगली मान्यता मिळवलीच, शिवाय उत्तम वक्त्या म्हणूनही लौकिक संपादन केला.
त्यांच्या कथा-नाटकांतले अनुभवाचे विश्व रोजच्या जीवनातले व कौटुंबिक आणि घरगुती स्वरूपाचे होते. तत्कालीन संस्कारशील मध्यमवर्गीयांचे प्रातिनिधिक ठरू शकेल, असे लेखन त्यांनी केले. ‘मनोरंजन’, ‘ज्ञानप्रकाश’, ‘खानदेश वैभव’ इत्यादी नियतकालिकांतून त्यांचे लेख प्रसिद्ध झाले. ‘पुस्तकी शीक नि व्यवहाराची भीक’, ‘पुरी हौस फिटली’ या कादंबर्या; ‘अंगठीचा प्रभाव’ ही दीर्घ सामाजिक कथा; ‘स्वभावचित्रे’, भाग १ व २, ‘केवळ विश्रांतीसाठी’ हे कथासंग्रह; ‘पुरुषाचे बंड’, ‘आयेषा’, ‘राजकुंवर’ (शिरकाणाचा सूड), ‘हीच मुलीची आई’, ‘मंदोदरी’ ही नाटके त्यांनी लिहिली.
त्यांच्या काही पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या, यावरून त्यांच्या लिखाणाची लोकप्रियता ध्यानी येते. ‘गृहिणी भूषण’, ‘पुष्पहार’, ‘स्त्रियांचा स्वर्ग’ ही त्यांची आणखी काही पुस्तके. त्यांचे ‘द्रौपदीची थाळी’ हे आत्मवृत्त असून स्त्री-शिक्षणाचे महत्त्व सांगणारे आणि पतिपरायण संसारी स्त्रीचे साधेसुधे जिव्हाळ्याने भरलेले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे १९२८ साली मुंबई नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद गिरीजाबाईंनी भुषविले.
( संदर्भ - महाराष्ट्र नायक)