लेखिका - अनू अगरवाल
अनुवाद - सुप्रिया वकील
ही गोष्ट आहे रातोरात यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या एका स्रीच्या आत्मशोधाची. मृत्यूचा उंबरठा शिवण्याच्या अनुभवाची, आणि पुन्हा जीवनरसाने फुलणाऱ्या आयुष्याची.
"अनयुज्वल" या इंग्रजी आत्मकथनाचा अनुवाद.
मुळशी दिल्लीची असलेल्या अनू ने सोशिओलॉजी या विषयातून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. काही सामाजिक संस्था बरोबर तिने स्त्रियांच्या प्रश्नावर काम केले.
तिच्या आकर्षक सावळ्या सौंदर्यामुळे तिला जाहिरात व्यवसायात बरीच मागणी होती. ते टाळण्यासाठी तिने भरपूर मानधनाची मागणी केली. ती पुर्ण होऊन गोदरेज मार्शल साबणाची जाहिरात केली. महेश भट यांनी तिला चित्रपटाचा प्रस्ताव दिला. हो ना करीत अनेक अटी टाकून होकार दिल्यावर तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. या चित्रपटासाठी कृत्रिम लुक्स नाकारले. नैसर्गिक अभिनयामुळे ती " वनटेक" आर्टिस्ट म्हणून नावाजली गेली.
आशिकी या सिनेमाद्वारे यशस्वी पदार्पण करून नंतर सुपर मॉडेल बनलेली अभिनेत्री अनु अग्रवालची फिल्मी कारकीर्द बहरली असताना काही वर्षानंतर सिने जगतापासून दूर गेली. फिल्मी मायाजालाचा उबग येऊन ती विपश्यनेकडे वळली. या योगाभ्यासाच्या प्रवासादरम्यान काही कडू गोड अनुभव या आत्मकथनातून ती सांगते.
हळूहळू भौतिक जगापासून लांब जात आत्मशक्ती शोधण्याच्या प्रयत्नात ती तांत्रिक योगाच्या वाटेवर गेली. तिच्या गुरुंनी तंत्रयोगात पूजनीय असलेल्या मातंगी देवीची उपमा देत तिला तांत्रिक योगाच्या परमोच्छ बिंदूचा अनुभव दिला. त्या वेळी लैंगिक स्तरावरील अनुभव मोकळेपणाने सांगीतला आहे.
त्या आश्रमात मत्सराचा बळी ठरल्यानंतर ती परत मुंबईला आली तेव्हा तिला एक भयंकर अपघात झाला. या अपघातात तिच्या हाडांचा अक्षरशः चक्काचूर झालेला होता अनेक दिवस ती कोमात होती. या अपघातातून जीवंत राहणं हा जणू चमत्कार होता.
यातून सावरल्यावर तिने संन्यासाश्रम स्विकारला होता.
योगीक शक्ती जागृत झाल्यामुळे आपल्याच व्यक्तिमत्त्वाकडे त्रयस्थपणे बघण्याचा अनूचा अविश्वसनीय आध्यात्मिक अनुभव आपल्याला चकित करतो.
एकीकडे चित्रपटसष्टीतील तिच्या भूमिकांचा प्रवास दुसरीकडे तिची योग साधना, मानसिक तगमग, मन शांतीचा अव्याहत शोध याचे प्रामाणिक कथन या पुस्तकात जाणवते.
अनू अगरवालने आपल्या नावाने एनजीओ स्थापन केला असून
"अनू अगरवाल फाऊंडेशन" द्वारे जागतिक स्तरावर व्यक्तिगत व सामाजिक संतुलन राखण्यासाठीचे अडथळे दूर करून मानसिक आरोग्यसाठी आपत्तीग्रस्तांचे सबलीकरणाचे काम केले जाते.