लेखिका - स्वाती चांदोरकर
फार पूर्वी कधीतरी मृत्यूनंतर शरीर जाळावं लागतं किंवा पुरावं लागतं असा शोध लागला असेल तेव्हा तो विधी नसेल तर दुर्गंधी येते म्हणून त्याची वासलात लावायची अशी भावना असेल. मग कालांतराने मृत्यू म्हणजे दुःख हे जाणवलं असेल आणि नंतर मग कधीतरी अंत्यविधीचे सोपस्कार तयार झाले असतील त्यातूनच मंदिरात पूजा अर्चा करणारे पवित्र आणि अंत्येष्टी करणारे अपवित्र असा भेद निर्माण झाला असेल. अंत्येष्टी करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या शुभकार्याच्या प्रसंगी आमंत्रण नसते.
दत्तू पुजारी गणेशपुर गावात लहानचा मोठा झाला. त्याचे वडील गणेश मंदिरात पुजारी होते. मंदिरासोबतच नदीपलीकडील वस्तीवर सुध्दा पुजा अर्चा करायला जायचे. गावातील ठराविक लोकांना भटजींचं हे वागणं पटत नव्हतं. नदीपलीकडील वस्ती होती खालच्या जातीची. त्या लोकांनी बांधलेली घरं चालत होती. त्यांनी फोडलेली लाकडं स्वयंपाकघरात येत होती. मात्र त्या लोकांना प्रवेश नव्हता.
वडिलांची ही शिकवण दत्तू पुजारी पाळीत होता. वेळप्रसंगी अंत्येष्टीचे विधी सुध्दा करीत होता. जो पर्यंत गावचे पाटील दत्तूच्या पाठीशी होते तोपर्यंत उघडपणे बोलण्याची गावकऱ्यांची हिम्मत नव्हती. कालांतराने पाटील वयाने थकले आणि गावकऱ्यांनी एका पुरोहीताला बोलवून गणेश मंदिराच्या गाभाऱ्यात उभे केले. दत्तू पुजारी हळूहळू कुटुंबासह एकटा पडू लागला. त्याला फक्त अंत्येष्टीचे आमंत्रण येत होते.
दत्तू पुजाऱ्याचा मुलगा गोविंदा आता जाणत्या वयात आला होता. आपल्या बाबांशी गावातले लोक कसे वागतात, शाळेत आपल्याला एकटं पाडलं जातं हे लक्षात येत होतं आणि आतल्या आत तो रागाने धुसमसत राहायचा. आई वारल्यावर बापलेकांमध्ये दुरावा वाढू लागला. त्याच्याच इच्छेनुसार दत्तू पुजाऱ्याने पुढील शिक्षणासाठी गोविंदाला मुंबईला पाठवलं. गावातील शाळेचे मुख्याध्यापक बदली होऊन मुंबईला गेले होते. त्यांच्या घरात वरकड काम करून राहायला जेवायला मिळत होतं.
गोविंदाला मित्र मिळाला होता, राकेश पिंटो त्याच्या आईसोबत राहायचा. आंतरधर्मीय लग्नानंतर त्याच्या आईने धर्म बदलायला नकार दिल्याने राकेशचे वडील त्याला आईसोबत सोडून निघून गेले होते.आईच्या चारित्र्याबद्दल चांगलं बोललं जायचं नाही. तिच्या बाॅस सोबत तिचे संबंध होते या अफवेमुळे कोणीही जास्त संबंध वाढवायचे नाही. म्हणून गोविंदाला सुध्दा त्याची मैत्री सोडण्यासाठी सांगीतलं गेलं.
ह्यात राकेशचा काय दोष असा प्रश्न गैविंदासमोर उभा राहिला तेव्हा त्याच्या आतल्या आवाजाने विचारले, वडील अंत्येष्टी करायचे म्हणून गावातील लोकांनी माझा दुस्वास का केला. हा ही प्रश्न त्याला राकेशच्या अजून जवळ घेऊन गेला.
राकेशची आई वारल्यावर तिने नवऱ्याला सोडलेलं आहे म्हणून चर्चने आणि तिन ख्रिश्चनाशी लग्न केलं म्हणून हिंदू रिवाजानुसार अंत्यसंस्कार अडले तेव्हा गोविंदा पुढे येऊन अंत्यसंस्काराची जबाबदारी घेतो.
मुंबईला येण्याअगोदर गोविंदा गणेश मंदिरात गेला होता, तेव्हा लहानपणी एवडसं असलेलं मंदिर आता किती भव्य झालयं हे बघून त्याच्या डोक्यात विचार चमकून गेला, वाढत्या भक्तांमुळे पुजारीही वाढले. दक्षिणा पदरात पाडण्याची चढाओढ सुध्दा वाढली. गणेशावर चढवलेले नारळ पुन्हा विक्रीसाठी ठेवणारे जिर्णोद्धार करता करता स्वतःच्या घराचा ही त्याच पैशातून जीर्णोद्धार करणारी ही पुजाऱ्यांची फलटण पवित्र कार्य करते आहे का? या सगळ्यांकडे डोळे झाक करून वावरणारे लोक दिवस रात्र काळ वेळ ऊन पाऊस थंडी काहीही न बघता अंत्यष्टीसाठी धावणाऱ्या माझ्या वडिलांना मात्र अपवित्र म्हणतात...असे का?
समाजात अगदी खोल पर्यंत रुळलेल्या प्रथा परंपरा शहरात तेवढ्या तीव्रपणे जाणवत नसल्या तरीही खेडोपाडी, लहान गावात कशा स्तोम माजवतात याचे उत्कृष्ट चित्रण केलेअसून दत्तू पुजारी, त्याची पत्नी कालिंदीची जातिभेदाच्या पलीकडे जाणारी वैचारिक परिपक्वता, त्याचवेळी वाढत्या वयात मुलांवर ते करीत असलेले संस्कार. बापलेकांमध्ये बापाच्या पुढाकाराने निर्माण झालेलं मित्रत्वाचं नातं हे सगळं मनावर खोल परिणाम करतं.
कथानकाचा कालखंड काही दशकं अगोदरचा असला तरी हे प्रश्न व या भावना आजही तेवढ्याच प्रखरतेने समाजमन ढवळून काढण्यास सक्षम आहेत.