लेखक - के पी पुर्णचंद्र तेजस्वी
अनुवाद - उमा कुलकर्णी
कन्नड मध्ये लोकप्रिय असलेली पंचवीस हून अधिक आवृत्त्या निघालेली अत्यंत मजेशीर निसर्गरम्य पार्श्वभूमीवर नर्मविनोदी कादंबरी.
एक लेखक जो सिनेसृष्टीशी निगडित असल्यामुळे प्रसिद्ध आहे तो या कथानकाचा निवेदक आहे.
मादण्णाने जंगलात उडता सरडा बघितल्यावर वनस्पती वैज्ञानिक व किटक शास्रज्ञ असलेल्या डॉ कर्वालो समोर जे वर्णन केले होते त्यानुसार काढलेल्या रेखाचित्रानुसार करोडो वर्षांपूर्वी विलुप्त झालेल्या सरड्याची एक जात असल्याची खात्री झाल्यावर डॉ कर्वालो मादण्णाला सोबत घेऊन जंगलात त्या सरड्याच्या शोधात जाणार होते. पण मादण्णाच्या काही अडचणी होत्या त्यामुळे तो काही वेळा अगदी वेडा व्हायचा. त्याचं लग्नाचं वय झालं होतं पण नौकरी नसल्यामुळे कोणी मुलगी द्यायला तयार नव्हतं. तो डॉ कर्वालोवर रागवला होता, कारण त्यांच्या खात्यात शिपायांच्या नोकरीसाठी त्याने केलेला अर्ज पुढे न करता डॉ कर्वालोंनी ती नोकरी दुसऱ्याल दिली होती. वास्तविक डॉ कर्वालोंच्या म्हणण्यानुसार मादण्णाची लायकी शिपायागिरीपेक्षा मोठी होती. शेवटी निवेदकाच्या मध्यस्थीने डॉ कर्वालो मुलीच्या बापाला भेटून मादण्णाच्या नौकरीची जबाबदारी घेतल्यालर मादण्णाचे लग्न होते तोच दारुची भट्टी लावली म्हणून पोलीस त्याला पकडून नेतात. खरं तर त्याने मडक्यात मधमाशा पाळल्या होत्या. डॉ कर्वालो यातूनही त्याला सोडवतात. आणि एकदाची विलुप्त झालेल्या उडणाऱ्या सरड्याच्या शोधयात्रेला सुरुवात होते.
झाडावर झटपट चढणारा माणूस सोबत पाहिजे म्हणून करीयप्पाला सोबत घेतले जाते. स्वयंपाक ही तोच करणार होता. जंगलात गेल्यावर त्यांना भेटतो साप पकडणारा, सापाचं विष काढणारा यंग्टा.
वैज्ञानिक असलेले डॉ कर्वालो, सुशिक्षित असणारे लेखक निवेदक, आणि कोणत्याही शिस्त न पाळणारे मादण्णा , करीयप्पा, यंग्टा आणि लेखक निवेदकाचा कुत्रा किवी.. ज्याला ते घरातला सदस्य समजत होते. इतर जण मात्र त्याला हाड हाड करायचे!
शोधयात्रेची पूर्णपणे केलेल्या आखणीचा पुरेपूर बोजवारा उडवत मादण्णा आणि करीयप्पा धावायचे.. डॉ कर्वालो त्यांच्यावर चिडल्याचाही अभिमान वाटायचा, कारण ते इंग्लिश मध्ये चिडायचे जे दोघांच्याही डोक्यावरून जायचे. या सगळ्यांमुळे निर्माण होणारे प्रश्न, आणि अचानक उद्भवणाऱ्या अडचणींचा सामना करीत या सगळ्यांची सह्याद्रीच्या दक्षिण टोकाकडील निबिड जंगलात चाललेल्या अद्भुतरम्य शोधयात्रीची रोमहर्षक कथा. कर्नाटकातील वेगळाच निसर्ग समोर आणणारी.