(१८ मार्च १९०५ - ७ मे २००१)
विख्यात मराठी कांदबरीलेखिका. अलंकार मंजूषा आणि का न केळकर यांच्याबरोबर लिहिलेला हिंदू व्यवहार धर्मशास्त्र ग्रंथांचा समावेश त्यांच्या आरंभीच्या लेखनात होतो. तथापि कळ्यांचे निःश्वास हा त्यांचा पहिला कथासंग्रह विभावरी शिरुरकर ह्या टोपण नावाने प्रसिद्ध होताच मराठी साहित्यविश्वात मोठीच खळबळ उडाली. .
पुरुषी अहंकाराचे स्त्रियांवर होणारे आघात, वाढत्या कौमार्यकाळामुळे त्यांचा होणारा भावनिक कोंडमारा ह्यांचे अत्यंत प्रत्ययकारी दर्शन त्यांनी ह्या संग्रहातील जिवंत कथातून घडविले होते. सहनशीलतेचा अंत झालेल्या स्त्रीमनाच्या विद्रोहाचा हा एक स्फोट होते. त्यामुळे विभावरी शिरुरकर हे नाव धारण करणारी व्यक्ती कोण असावी, ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न अनेकांनी केला पण त्यात त्यांना यश आले नाही. पुढे अनेक वर्षानी साखरपुडा या मराठी चित्रपटासाठी त्यांची कथा घेतली गेली, तेव्हा विभावरी शिरुरकर म्हणजे मालतीबाई बेडेकर होत, हा गौप्य स्फोट झाला.
विरलेले स्वप्न , बळी, जाई, शबरी ह्यासांरख्या कांदबऱ्या त्यांनी लिहिल्या. आपल्या कांदबऱ्यातूनही, मराठी साहित्यात दीर्घकाळ अव्यक्त राहिलेले स्त्रियांच्या व्यथांचे एक वेगळे वेदनाविश्व त्यांनी अत्यंत प्रांजळपणाने साकार केले.
त्यांच्या बळी ह्या कादंबरीने मात्र एका नव्याच जाणिवेला वाट करून दिली. गुन्हेगार मानल्या गेलेल्या जमातींच्या जीवनाचे सूक्ष्म, मार्मिक व वास्तव चित्र ह्या कांदबरीत त्यांनी उभे केले. पारध आणि हिरा जो भंगला नाही हयांसारखी काही नाटकेसुध्दा त्यांनी लिहिली आहेत.त्यांच्या बहुतेक कांदबऱ्यांची गुजरातीत भाषांतरें झाली आहेत. बळी, शबरी आणि घराला मुकलेल्या स्त्रिया ह्या तीन पुस्तंकाना राज्य शासनाची पारितोषिके मिळाली.१९८१ साली मुंबई येथील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
( संदर्भ मराठी विश्वकोश)