(२० मे १८५०–१७ मार्च १८८२).
‘आधुनिक मराठी गद्याचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे श्रेष्ठ मराठी ग्रंथकार.त्यांचे वडील कृष्णशास्त्र्यांनी चालविलेल्या शालापत्रक ह्या मासिकातून विष्णुशास्त्र्यांच्या लेखनाचा आरंभ झाला (१८६८) व त्यानंतर काही वर्षांतच ते ह्या मासिकाचे संपादकही झाले.निबंधमाला हे विष्णुशास्त्र्यांचे प्रमुख जीवितकार्य. निबंधमालेच्या सात वर्षांच्या कारकीर्दीत अंकांतील लेखन विष्णुशास्त्र्यांनी जवळजवळ एकटाकी केले. निबंधमालेत विविध विषयांवर लिहिलेल्या त्यांच्या निबंधानी मराठी निबंधाला सामर्थ्य दिले आणि त्याच्या विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा गाठला. कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी सुरू केलेले सॅम्युएल जॉन्सनच्या रासेलस ह्या ग्रंथाचे भाषांतर विष्णुशास्त्र्यांनीच शालापत्रकातून क्रमशः पूर्ण केले. ह्याच मासिकातून कालिदास, भवभूती, बाण, सुबंधू आणि दंडी ह्या संस्कृत कवींवर त्यांनी जे समीक्षात्मक निबंध लिहिले, ते पुढे संस्कृत कविपंचक ह्या नावाने प्रसिद्ध झाले. ह्या निबंधानी काव्यसमीक्षेच्या पाश्चात्त्य दृष्टीला महत्त्व दिले व प्राचीन कवींचा काल, कविता आणि कला मीमांसेत ऐतिहासिक दृष्टी वापरली.
शालापत्रक, निबंधमाला, केसरी नियतकालिकांतून विष्णुशास्त्र्यांनी जे लेखन केले ते भाषा-साहित्यविषयक, सामाजिक, राजकीय असे विविध प्रकारचे आहे. त्यांच्या भाषा-साहित्यविषयक लेखांत मराठी भाषेची तत्कालीन स्थिती, भाषापद्धती, परभाषेतील शब्दांची योजना, इंग्रजी भाषा, कविता, विद्वत्व आणि कवित्व, ग्रंथांवरील टीका वगैरे विषयांवरील लेखन अंतर्भूत आहे. लोकभ्रम, अनुकरण, गर्व ह्यांसारखे विषय त्यांच्या सामाजिक लेखनात आलेले आहेत. ‘आमच्या देशाची स्थिती’ आणि ‘मुद्रणस्वातंत्र्य हे दोन लेख त्यांच्या राजकीय लेखनापैकी विशेष उल्लेखनीय होत.
( संदर्भ - मराठी विश्वकोश)