टाईमपास

पुस्तकाचे नाव - टाईमपास
लेखिका - प्रोतिमा बेदी
संकलन व शब्दांकन - पुजा बेदी




अपरिमित ऊर्जा व धैर्य असलेल्या बुद्धिमान स्त्रीची कहाणी आहे. ही स्त्री स्वत:च्या मनाला पटेल त्याच प्रकारचं आयुष्य जगली, स्वत:च्या जबाबदारीवर जगली. समाजाच्या निती नियमांचा तिने पार धुव्वा उडवला. 

ते साल होतं १९७४. मुंबईच्या मध्यावरच्या एका गजबजलेल्या रस्त्यावर भरदिवसा विवस्त्रावस्थेत फिरणाऱ्या प्रोतिमा बेदीची छायाचित्रं काही मासिकांत व वृत्तपत्रांत झळकली आणि सर्वत्र एकच हलकल्लोळ माजला. प्रोतिमा बेदी एक स्कॅन्डलस् मॉडेल… बेमुर्वतखोरपणे लैंगिकतेचं– शरीराचं प्रदर्शन मांडणारी ही तरुणी म्हणजे हॉलिवुडचा उगवता सितारा कबीर बेदी याची पत्नी.  ही घटना घरातून पळून जाऊन कबीर बेदीबरोबर लग्नाशिवाय ‘तसंच’ राहणाऱ्या प्रोतिमाच्या तोवरच्या बिनधास्त आयुष्याचा  म्हणजे कळसबिंदूच ठरावा! 


परंतु त्यानंतर अवघ्या चारच वर्षांनी ग्लॅमरमध्ये झळाळणाऱ्या या मुलीनं ओडिसी नृत्यांगना म्हणून नैपुण्य मिळवलं, त्यासाठी मात्र तिला प्रचंड कष्ट घ्यावे लागले होते. अगोदर कोणताही नृत्य प्रकार केलेला नसतांना नृत्य शिकायला सुरुवात केल्यावर अवघ्या तीन वर्षांत तिने नृत्याचे स्टेज शो करायला सुरुवात केली होती. आणि तोकडे स्कर्ट व उघड्या गळ्याचे ब्लाऊज घालणारी ही मुलगी अंगभर साडी, ब्लाऊज आणि मोठ्ठं कुंकू अशा सोज्वळ रूपात जगाला दिसू लागली. आपली कला तिनं कालीमातेच्या चरणी समर्पित केली होती. 

प्रोतिमा बेदीसारखं वादात्मक व अपवादात्मक वेगवेगळ्या घटनांनी व्यापलेलं आयुष्य कुठे अभावानंच आढळेल. तिच्या आत्मचरित्रातील काही अंश, रोजनिशीतील काही भाग, नियतकालिकं तसंच मित्र-मैत्रिणी, कुटुंबीय व प्रियकरांना तिनं लिहिलेली पत्रं यावरून ‘टाईमपास’ हे पुस्तक बनलं आहे. या तिच्या अत्युत्कट स्मृती आहेत. मुक्तपणे लिहिलेल्या… धक्कादायक वाटतील इतक्या मुक्त… यात प्रोतिमानं आपल्या आयुष्याला वळण देणाऱ्या सर्व घटना अतिशय प्रामाणिकपणे, निर्भीडतेनं मांडल्या आहेत : लहानपणी ‘बदकाच्या कुरूप पिल्लाप्रमाणे’ मिळालेली अपमानास्पद वागणूक, वयाच्या दहाव्या वर्षी आतेभावानं रोज रात्री बलात्कार करणं, कबीर बेदीबरोबर फसलेला विवाह, अनेक पुरुषांशी असणारे लैंगिक संबंध आणि ख्यातनाम कलावंतांशी व राजकीय नेत्यांशी असणारे ‘रोमँटिक’संबंध, या सर्व गोष्टी सांगताना तिनं काहीही हातचं राखून ठेवलेलं नाही. त्याचप्रमाणे पुढे नृत्यात समर्पित भावनेनं तिच्या मनाची झालेली आत्यंतिक गुंतवणूक, आपल्या गुरूशी असणारं तिचं नातं, सहाध्यायींशी असणारं नातं, नृत्यग्राम उभारण्याचं अवघड काम करताना आलेले अनुभव, मुलाची आत्महत्या, ज्या दारुण शोकांतिकेतून ती कधीच सावरली गेली नाही अशाही अनेक गोष्टींविषयी तिनं मनमोकळेपणे लिहिले आहे.

ती स्वत: कायम आनंदाच्या परमोच्च बिंदूवर होती, असं नव्हतं. तीही माणूस होती. पण तिनं जे जे काही केलं, जगणं, प्रेम करणं, भावबंध बनवनं तोडणं....अगदी मनापासून केलं, जीव ओतून केलं, ठामपणे केलं.ती तिच्या मुलांना सांगायची, “खिडकीतून बाहेर दिसतं तेवढंच जग नसतं. विश्वाच्या प्रचंड पसाऱ्यातला आपण एक सूक्ष्मतम कण आहोत. लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, समाजाची चौकट, नियम यात आपण किती रुतलेलो असतो! खरं तर वस्तुस्थिती अशी आहे की, हा फक्त ‘टाईमपास’ आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद लुटा, अगदी दु:खातलासुद्धा प्रत्येक क्षण मजेत जगा. जिवंत असण्याचा आनंद साजरा करा. आनंदी होणं ही फार फार सोपी गोष्ट आहे.”



मृत्यूच्या काही काळ अगोदर तिनं मुंडन केलं होतं; आणि संन्यस्त जीवन जगण्याचा तिचा निर्धार होता. ऑगस्ट १९९८ मध्ये कैलास-मानसरोवर तीर्थयात्रेला गेली असता, हिमालयात दरड कोसळून झालेल्या अपघातात तिचा मृत्यू झाला. प्रोतिमा गेली… मागे राहिलं तिनं परिश्रमातून उभारलेलं नृत्यग्राम… बहरलेलं नृत्यग्राम, जिथे विद्यार्थी पारंपरिक भारतीय नृत्यशैलीचा अभ्यास करतात.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.