रवींद्र पिंगे

रविंद्र पिंगे 



( १३ मार्च १९२६ - १७ ऑक्टोबर २००८ )   


१९५५ मध्ये ‘मौज’ साप्ताहिकात युसुफ मेहेरअलींची व्यक्तिरेखा लिहून पिंग्यांनी लेखनाचा श्रीगणेशा गिरवला, आणि पुढे सतत पन्नास वर्षे पिंगे लिहीत होते. ४० ग्रंथांची निर्मिती त्यांच्या नावे जमा झाली आहे. चपखल लेखशीर्षके, अचूक, व नेमकी शब्दयोजना ललित्यपूर्ण, एकात्म, एकसंध, बंदिस्त भाषाशैली हे पिंग्यांचे खास वैशिष्ट्य होय. 



मौज, साधना, माणूस, वीणा, नवशक्ती, सकाळ, केसरी, महाराष्ट्र टाइम्स, सत्यकथा, ललित इत्यादींमधून त्यांचे लेखन प्रसिद्ध होऊ लागले. ‘देवाघरचा पाऊस’ , ‘दिवे लक्ष्मण  दिवे’, ‘अत्तर आणि गुलाबपाणी’  हे लेखसंग्रह; ‘आनंदाच्या दाही दिशा’, ‘आनंदव्रत’, ‘दुसरी पौर्णिमा’ ही प्रवासवर्णने; ‘पश्चिमेचा पुत्र’ , ‘पिंपळपान’ , ‘हिरवीगार पानं’  ही पाश्‍चात्त्य साहित्याचा परिचय करून देणारी पुस्तके; ‘परशुरामाची सावली’  ही कादंबरी; ‘प्राजक्ताची फांदी’ व ‘सुखाचं फूल’ हे कथासंग्रह; असे विविध स्वरूपाचे लेखन पिंगे यांनी केले. विशेष म्हणजे त्यांचे सुमारे दोनशे ललितलेख ‘माणूस’ साप्ताहिकातून सतत पाच वर्षांच्या प्रसिद्ध कालावधीत झाले. ‘साहित्यसूची’चे ते लेखक आणि संपादकीय सल्लागार होते. ‘सर्वोत्तम रवींद्र पिंगे’, तीनशे भारतीयांची व्यक्तिचित्रे, पाश्चात्त्य साहित्यसेवकांचे दोनशे परिचय, शंभर प्रवासवर्णने, हजारो पुस्तक परीक्षणे, साठ मानपत्रे, पाच-सहाशे ललितलेख, पन्नास कथा आणि तितकेच अनुवाद ही पिंगे यांची लेखनसंपत्ती होय.


 ‘परशुरामाची सावली’ला राज्यपुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यांना ‘कोकण साहित्यभूषण पुरस्कार’, सोलापूरचा ‘दमाणी पुरस्कार’, गुणसमृद्ध लेखन दीर्घकाळ सातत्याने केल्याबद्दल पुण्याच्या साहित्य परिषदेनेही त्यांना खास पुरस्कार दिला. 
( संकलीत)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.