सुधीर मोघे
( ८ फेब्रुवारी १९३९ - १५ मार्च २०१४ )
कवितेची उत्तम जाण असणाऱ्या आणि कवितेलाच आपला प्राण मानणाऱ्या सुधीर मोघे यांचे शब्दमाध्यमावरचे प्रेम नितांत होते,
‘शब्दांना नसते दु:ख शब्दांना सुखही नसते
ते वाहतात जे ओझे ते तुमचे माझे असते’
या शब्दांतून सहज त्याचा प्रत्यय येतो.
कवी-गीतकार म्हणून सुधीर मोघे जेवढे आणि जसे श्रेष्ठ होते, तेवढे आणि तसेच ते संगीतकार म्हणूनही मोठे होते, त्यांनी संगीत दिलेल्या ‘कशासाठी प्रेमासाठी’ या मराठी चित्रपटाची गाणी जशी गाजली तशीच ‘सूत्रधार’ या हिंदी चित्रपटाचीही गाजली.
‘स्वामी’, ‘अधांतरी’, ‘नाजुका’ या दूरदर्शनवरील मालिकांना त्यांनी दिलेले संगीत प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे. त्यांनी ‘हसरतें’, ‘डॉलर बहू’, ‘शरारतें’ या हिंदी मालिकांनाही संगीत दिले. त्यांनी व्यावसायिक माहितीपटांची केलेली निर्मितीही त्यांच्यातील सर्जनशीलतेची ग्वाही देते.
त्यांच्या गीतांनी मानवाच्या मनातील नानाविध भावनांचा सहजाविष्कार सातत्याने केलेला दिसतो. म्हणूनच ‘हा खेळ सावल्यांचा’ या चित्रपटातील ‘गोमू संगतीने’ हे उडत्या चालीचे गीत ते ज्या ताकदीने लिहू शकले, त्याच ताकदीने त्यांनी ‘रात्रीस खेळ चाले’ हे गूढार्थभाव व्यक्त करणारे गाणेही शब्दबद्ध केले. ‘भावनांचा सहजाविष्कार’ हे त्यांच्या गीतलेखनाचे एक प्रमुख वैशिष्ट्य. राज्य पुरस्कार सर्वोत्कृष्ट गीतकार (४ वेळा), सूरसिंगार पुरस्कार सर्वोत्कृष्ट गीतकार (२ वेळा), गदिमा प्रतिष्ठानचा चैत्रबन पुरस्कार,महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कविवर्य ना.घ. देशपांडे पुरस्कार, असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले . ( संदर्भ - महाराष्ट्र नायक)