(१३ मार्च १८९३ – ३ एप्रिल १९८५)
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय प्राच्यविद्यासंशोधक व भारतविद्यातज्ज्ञ.प्राचीन शिलालेख, नाणी आणि अभिजात प्राचीन संस्कृत साहित्य ही त्यांची प्रमुख कार्यक्षेत्रे. त्यांनी वाकाटकांच्या ताम्रपटांचा व शिलालेखांचा मागोवा घेऊन सध्याचे रामटेक म्हणजेच मेघदूतातील रामगिरी होय, असा सिद्धांत मांडला (१९३४).अजिंठ्याच्या लेखातील ‘सुवीथिʼ या शब्दाचे योग्य वाचन करून अजिंठ्याच्या लेणी क्रमांक १६, १७, १९ व २१ मधील भित्तिचित्रे वाकाटकांच्या कारकिर्दीत काढली गेली, हे त्यांनी स्पष्ट केले.
शिलालेख व ताम्रपट यांच्या अचूक वाचनाबरोबरच नाणकशास्त्रातही अजोड कामगिरी केली. कॉर्पस् इन्स्क्रिप्शनम् इंडिकॅरम् या ग्रंथमालेचे मिराशी हे पहिले भारतीय संपादक होत.मिराशींनी प्रामुख्याने इंग्रजीतून लेखन केले; तथापि प्रारंभीचे त्यांचे ग्रंथलेखन मराठीत आहे. त्यांच्या इंग्रजी ग्रंथांपैकी इन्स्क्रिप्शन्स ऑफ द कलचुरी चेदी-इरा , इन्स्क्रिप्शन्स ऑफ द वाकाटकज , स्टडीज इन इंडॉलॉजी, कालिदास, हिज लाईफ अँड वर्क्स , भवभूती, हिज डेट, लाईफ अँड वर्क्स , इन्स्क्रिप्शन्स ऑफ द शिलाहारज , लिटररी अँड हिस्टॉरिकल स्टडीज इन इंडॉलॉजी इत्यादी प्रसिद्ध ग्रंथ होत. तसेच त्यांच्या ग्रंथांची प्रादेशिक भाषांतून – विशेषत: हिंदी, ओडिया, कन्नड – भाषांतरे झाली आहेत.
मिराशी यांना अनेक शिष्यवृत्त्या, पारितोषिके मिळाली.तत्कालीन ब्रिटिश सरकारची ‘महामहोपाध्यायʼ ही उपाधी (१९४१)तसेच १९५६ मध्ये राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते व १९६१ मध्ये राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या हस्ते ताम्रपट; भारत सरकारतर्फे पद्मभूषण (१९७५) इत्यादी मानसन्मान त्यांना लाभले. ( संदर्भ - मराठी विश्वकोश)