( २४ जुन १८९२ - २१ मार्च १९८४ )
कवी,बालसाहित्यकार,रविकीरण मंडळाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक. त्यांनी आणि त्यांच्या पत्नी मनोरमाबाई या दोघांनी लिहिलेल्या ७५ स्फुट कवितांचा संग्रह ‘श्रीमनोरमा’ या नावाने प्रसिद्ध आहे.
त्यांचे ‘काळाच्या दाढेतून’ हे खंडकाव्य १९१५ साली प्रसिद्ध झाले. ते एकदा कॉलर्याने आजारी पडले असता बालपणीच्या अनेक आठवणी त्यांच्या मनात जाग्या झाल्या. प्रत्यक्ष मृत्यूच्या दारात जाऊन परत येण्याचा अनुभव त्यांनी घेतला. त्या वेळच्या मनःस्थितीचे वर्णन या खंडकाव्यात आहे. ‘माधुकरी’
आणि ‘लेझीम’ या त्यांच्या कविता विशेष गाजल्या. त्यांनी संपादन केलेले ‘महाराष्ट्र रसवंती’चे भाग १ ते ३ १९३५ ते १९३९ या काळात प्रसिद्ध झाले. तसेच त्यांनी संपादन केलेल्या ‘मराठी गद्यवैभव’ यांचे प्रकाशनही या काळात झाले. तसेच ‘नवयुगवाचनमाला’चे संपादनही त्यांनी केले.
साध्या सोप्या भाषेतल्या रचनांमुळे लोकप्रिय झालेल्या रविकिरण मंडळाच्या कवितेने वाचकांना कवितेकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन दिला. या दृष्टीने श्री.बा.रानडे यांचे काव्यक्षेत्रातले आणि बालसाहित्यातले योगदान निश्चितच महत्त्वाचे आहे.
( संदर्भ - महाराष्ट्रनायक, डॉ ज्योत्स्ना कोल्हटकर)