( २० मार्च १९११ - १६ मे १९९४ ) कथाकार, कादंबरीकार, अनुवादक, समीक्षक. १९४० साली त्यांची ‘ज्वाला’ ही कादंबरी प्रकाशित झाली. त्यानंतर ‘एक आणि दोन’ , ‘सुखदुःख’, ‘कैफियत’, ‘दौरा’, अशा अनेक कादंबर्या प्रकाशित झाल्या. कृष्णचंद्र यांच्या ‘अन्नदाता’ या उर्दू कादंबरीचा त्यांनी अनुवाद केला. कॅरेल कॅपेक ह्यांच्या ‘मदर’चा ‘आई’ हा नाट्यानुवाद १९४२ साली प्रकाशित झाला. ‘सत्यकथा’ ह्या नियतकालिकात त्यांनी सतत वर्षभर, कॅरेल कॅपेकच्या कथांचे केलेले अनुवाद प्रसिद्ध होत होते.
माधव मनोहरांनी २००हून अधिक कथा लिहिल्या. ‘सशाची शिंगे’, ‘झोपलेले नाग’ ही नाटके लिहिली. त्यांच्या नाट्यविषयक स्तंभलेखनामुळे ते विशेष गाजले. ललित मासिक, सोबत साप्ताहिक आणि नवशक्ती दैनिकातून त्यांनी स्तंभलेखन केले. ‘सोबत’मध्ये त्यांचे ‘पंचम’ नावाचे नाट्यविषयक सदर अनेक वर्षे चालू होते. ह्या सदरातून ते नाटकाची संहिता आणि नाटकाचा प्रयोग असे द्विस्तरीय परीक्षण लिहीत असत. ‘केसरी’मध्ये ‘चौपाटीवरून’ हे सदर ते ‘पवन’ ह्या टोपणनावाने लिहीत असत. ‘नवशक्ती’मध्ये ‘शब्दांची दुनिया’ या सदरातून ते पुस्तक-परीक्षणे लिहीत. ‘ललित’मधून त्यांनी अनेक पाश्चात्त्य लेखकांचा परिचय करून दिला.
त्यांचे समीक्षालेखन परखड व निर्भीड होते. अनेकांचे वाङ्मयचौर्य त्यांनी उघडकीस आणले. त्यामुळे तत्कालीन वाङ्मय व्यवहारावर त्यांचा जबरदस्त वचक होता; १९९० साली सातारा येथील नाट्यसम्मेलनाचे ते अध्यक्ष होते.