(१ डिसेंबर १९०९−२० मार्च १९५६).
अर्वाचीन मराठी साहित्यातील युगप्रवर्तक कवी तसेच नवकविता व नवटीका ह्यांचा प्रारंभ करणारे श्रेष्ठ साहित्यिक.
अनेक पूर्वसूरींचे संस्कार पचवून त्यांतून स्वतःच्या कवितेचे अस्सल रसायन त्यांनी तयार केले. अभंग आणि ओवी ह्या प्राचीन मराठी रचनाप्रकारांचे मर्ढेकरांनी पुनरूज्जीवन केले. त्यांची कविता ही नवकविता किंवा नवकाव्य म्हणून ओळखली जात असली, तरी पूर्वपरंपरेशी तिचे निश्चित नाते आहे.
कवितेप्रमाणे कादंबरीच्या क्षेत्रातही मर्ढेकरांनी नवे प्रयोग केले. रात्रीचा दिवस ही जेम्स जॉइस आणि व्हर्जिनिया वूल्फ ह्यांच्या कादंबऱ्यां पासून प्रेरणा घेऊन लिहिलेली कादंबरी. दिक्पाल ह्या एका सहसंपादकाच्या जीवनातील काही तासांच्या संज्ञाप्रवाहाचे चित्रण ह्या कादंबरीत आहे. मात्र ह्या प्रयोगापेक्षाही तिच्यातील काव्यात्मकता जास्त तीव्रतेने जाणवते. वरवर असंबद्ध वाटणाऱ्या घटना आणि व्यक्ती दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर कशा विचित्र तऱ्हेने एकत्र येतात ह्याचे अत्यंत अलिप्त चित्रण मर्ढेकरांनी तांबडी माती ह्या कादंबरीत केलेले आहे.
पाणी ही कादंबरी तांबडी माती ह्या कादंबरीच्याच पट्टीतली. तथापि तीत प्रतिमांचा सातत्याने आणि प्रभावी उपयोग करण्याचे तंत्र त्यांनी वापरले आहे. पश्चिमी ऑपेरांपासून स्फूर्ती घेऊन मर्ढेकरांनी आपल्या संगीतिका लिहिल्या. नटश्रेष्ठ हे त्यांचे एकुलते एक नाटक.समीक्षेच्या क्षेत्रातील मर्ढेकरांची कामगिरी संस्मरणीय ठरली. संगीत, चित्रकला, शिल्पकला, नृत्य ह्यांसारख्या ललित कलांसारखीच साहित्य हीही एक ललितकला असल्यामुळे साहित्यनिर्मितीत साहित्यसमीक्षा ही सौंदर्याशास्त्राच्या आधारे व्हावयास पाहिजे इंद्रियसंवेदनांची लयबद्ध रचना म्हणजे कलाकृती म्हणूनच कलात्मक साहित्यात घाटाला महत्व अशी त्यांची भूमिका होती.
साहित्य आणि सौंदर्य या त्यांच्या ग्रंथाला 1956 चे साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. ( संदर्भ - मराठी विश्वकोश)