(३ सप्टेंबर १९२३–२० मार्च, २०१५) )
ख्यातकीर्त मराठी शाहीर व लोकनाट्य कलाकार. पूर्ण नाव कृष्णराव गणपतराव साबळे परंतु शाहीर साबळे ह्या नावानेच ते परिचित आहेत. अमळनेरला त्यांना साने गुरुजीं चा सहवास लाभला.गुरुजींकडून प्रखर राष्ट्रवाद आणि निर्व्याज देशभक्तीचे बाळकडू आत्मसात केले. देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत जनजागृती करण्यासाठी गुरुजींबरोबर ते दौरे करू लागले. तसेच राजकीय सामाजिक अपप्रवृत्तींवर प्रहार करण्यासाठी शाहिरी माध्यमाचा उपयोग करुन घेतला.
हैदराबाद मुक्तिसंग्रामातही त्यांनी प्रचाराचे रानउठवले.स्वातंत्र्यप्राप्तीनंतर
‘जातीयवाद की समाजवाद’ (१९४७) हा पहिला पोवाडा लिहिला. स्वतंत्र भारतात नव्याने सुरु झालेल्या राजकारणाचा संदर्भ ह्या पोवाड्याला होता. त्यांचा विशेष उल्लेखनीय पोवाडा म्हणजे आधुनिक मानवाची कहाणी.त्यात त्यांनी साम्यवादाचा विचार मांडला आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात पंढरपूरच्या विठ्ठललमंदिरात अस्पृश्यांना प्रवेश द्यावा, म्हणून साने गुरुजींनी प्राणांतिक उपोषण आरंभिले होते. त्या वेळी शाहिरांनी आपल्या पथकासह ह्या मंदिरप्रवेशासाठी महाराष्ट्रभर प्रचार करुन अनुकूल वातावरण निर्माण केले. तसेच पसरणीच्या भैरवनाथ मंदिरात साने गुरुजी, सेनापती बापट, कर्मवीर भाऊराव पाटील ह्यांच्या उपस्थितीत अस्पृश्यांचा प्रवेश घडवून आणला. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गोवामुक्ती आंदोलन ह्यांतही जनजागृतीसाठी त्यांनी प्रभावी शाहिराची भूमिका बजावली. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर कवी राजा बढे ह्यांनी रचलेले आणि श्रीनिवास खळे ह्यांनी संगीतबद्घ केलेले ‘गर्जा महाराष्ट्र माझा ‘हे गीत शाहिरांनी गायिले. ह्या गाण्याने त्यांना अमाप कीर्ती लाभली. या गीताला राज्य गीताचा सन्मान मिळाला.त्यांची एकूण १४ मुक्तनाट्ये असून त्यांतील नऊ त्यांनी, तर पाच इतर लेखकांनी लिहिली आहेत. शाहिरांनी त्यांच्या सर्व मुक्तनाट्यांतून समाज प्रबोधनाला योग्य असे विषय प्रभावीपणे सादर केले. महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाने त्यांच्या जीवनात मोठे यश आले. भारतीय शांती दूध मंडळाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी रशियाचा दौरा केला. तसेच जागतिक मराठी परिषदेसाठी अन्य कलाकारांसह मॉरिशसचा ही दौरा केला." माझा पवाडा" हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र गौरव पुरस्कार (१९९०), महाराष्ट्र रत्न पुरस्कार (२००६), याव्यतिरिक्त अनेक पुरस्कार मिळाले असून भारत सरकार तर्फे १९९८ ला त्यांना पद्मश्री हा किताब देऊन गौरवण्यात आले.