(५ जानेवारी १९१३ –२३ मार्च २००७ )
श्रेष्ठ मराठी कादंबरीकार.खडकावरील हिरवळ (१९४१) हे पेंडसे ह्यांचे पहिले पुस्तक. त्यात त्यांनी लिहिलेली शब्दचित्रे संगृहीत केलेली आहेत. अशा शब्दचित्रात्मक लेखनाकडून नंतर ते कादंबरीकडे वळले. एल्गार ह्या त्यांच्या पहिल्याच कादंबरीला जाणत्या रसिकांचा आणि समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर हद्दपार, गारंबीचा बापू , हत्या, यशोदा , कलंदर, रथचक्र, लव्हाळी आणि ऑक्टोपस अशा नऊ कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या.
एल्गारपासून कलंदरपर्यंतच्या सहा कादंबऱ्यांत कोकणचा निसर्गसमृद्ध प्रदेश त्यांनी प्रभावीपणे चित्रित केल्यामुळे प्रादेशिक कादंबरीकार म्हणून त्यांची प्रतिमा प्रस्थापित झाली. घटना-प्रसंग, निवेदन, संवाद, भाषाशैली ह्यांसारख्या कादंबरीच्या घटकांची वेगवेगळी जाणीव ठेवून कांदबरीत केल्या जाणाऱ्या कृत्रिम सजावटीचे तंत्र त्यांनी स्वीकारले नाही. त्यांच्या प्रत्येक कादंबरीतील जीवनानुभव सहज-स्वाभाविकपणे रूपास येत गेला त्यामुळे कादंबरीच्या रूपाची एक वेगळी, अधिक परिपक्व जाणीव जोपासणारे कादंबरीकार म्हणूनही ते ख्याती पावले.रथचक्र, लव्हाळी आणि ऑक्टोपस ह्या तीन कादंबऱ्या, पेंडशांच्या कादंबरीने घेतलेल्या वेगळ्या वळणाच्या द्योतक आहेत.तुंबाडचे खोत या महाकांदबरीत एका घराण्यातील पाच पिढ्या रंगवल्या आहेत.
पेंडशांनी नाट्यलेखनही केलेले आहे. राजे मास्तर , यशोदा, गारंबीचा बापू , असं झालं आणि उजाडलं ही त्यांची नाटके त्यांच्या अनुक्रमे हद्दपार,यशोदा, गारंबीचा बापू आणि लव्हाळी ह्या कादंबऱ्यांची नाट्यरूपे असून महापूर, संमूसांच्या चाळीत, चक्रव्यूह अशी काही स्वतंत्र नाटकेही त्यांनी लिहिली आहेत. जुम्मन हा त्यांचा कथासंग्रह.श्री. ना. पेंडसे : लेखक आणि माणूस हे त्यांचे आत्मचरित्र १९७४ मध्ये प्रसिद्ध झाले. आपल्या जीवननिष्ठांचा आणि जीवनातील घटनांचा अन्वयार्थ लावण्याची डोळस चिंतनशीलता ह्या आत्मचरित्रात आढळून येते. हद्दपार हत्या कलंदर या कादंबऱ्यांना व संमुसाच्या चाळीत व चक्रव्यूह या नाटकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाले आहेत. अन्य भाषातूनही त्यांचे साहित्य अनुवादित झाले आहे.
रॉकफेलर फाउंडेशनच्या लेखकांकरता असलेल्या प्रवास शिष्यवृत्ती करिता १९५५ मध्ये त्यांची निवड झाली होती. ही शिष्यवृत्ती मिळवणारे श्रीना पेंडसे हे मराठीतील व भारतातीलही पहिलेच साहित्यिक होते.