( २२ जुलै १९२५ - २२ मार्च २०१७ )
महाराष्ट्र टाइम्सच्या संपादकपदाची धुरा तब्बल २७ वर्षं सांभाळलेले गोविंद तळवलकर हे पत्रकारितेतील मानदंड ठरले होते. लो. टिळकांची परंपरा जपणारे आणि सामान्यांनाही समजेल अशी लेखनशैली जोपासणारे तळवलकर हे खऱ्या अर्थाने 'अग्रलेखांचे बादशहा' होते. भाषेवरील प्रभुत्व, राजकीय आणि सामाजिक भान आणि प्रचंड व्यासंग या जोरावर त्यांनी अग्रलेखांना एका वेगळ्या उंचीवर नेलं होतं. ज्येष्ठ कवी ग. दि. माडगुळकर यांनी त्यांचा उल्लेख 'ज्ञान गुण सागर' असा केला होता. त्यातून त्यांच्या कर्तृत्त्वाची कल्पना येऊ शकते.
गोविंद तळवलकरांंनी मराठीसोबत इंग्रजीतही विपुल लिखाण केलं होतं. टाइम्स ऑफ इंडिया, द टेलिग्राफ, द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, फ्रंटलाइन मॅगझिन, डेक्कन हेरॉल्ड या वृत्तपत्रांमधील त्यांचे लेखही गाजले होते. साहित्यक्षेत्रातही गोविंद तळवलकर यांनी आपल्या प्रतिभेचं दर्शन घडवलं होतं.
त्यांची २५ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. नौरोजी ते नेहरू, विराट ज्ञानी - न्यायमूर्ती रानडे, नेक नामदार गोखले, भारत आणि जग, इराकदहन, अग्निकांड, अग्रलेख, पुष्पांजली, लाल गुलाग, नियतीशी करार, बदलता युरोप, सोव्हिएत साम्राज्याचा उदय आणि अस्त ( या पुस्तकाला न चि केळकर पुरस्कार मिळाला) ही त्यापैकी काही संग्राह्य साहित्यसंपदा. ती पुढच्या अनेक पिढ्यांसाठी मोलाचा दस्तऐवज ठरणार आहे.त्यांना भारत सरकारच्या लोकमान्य टिळक पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले होते.
( संदर्भ - महाराष्ट्र टाइम्स)