थॅंक्यू मिस्टर ग्लाड

पुस्तकाचे नाव - थॅंक्यू मिस्टर ग्लाड
लेखक - अनिल बर्वे 




दोन परस्पर विरोधी व्यक्तिमत्वे एक अत्यंत निष्ठुर जेलर, एक फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेला क्रांतिकारक जो डाॅक्टर आणि कवी आहे. 

जेलर मिस्टर ग्लाड ची दहशत इतकी होती की, तुरुंगाच्या भिंती तेवढ्या त्याच्यासमोर वाकत नसत. बाकी सगळे अगदी कमरेपासून वाकायचे. बारा जेलचे पाणी प्यायला काला टोपी असो नाहीतर छपन्न जेल फोडून पळालेला लाल टोपी असो ग्लाड साहेबांसमोर सारे कैदी कसे अगदी चळाचळा कापत. रोज एक तरी दांडकं कोणाच्या तरी पाठीवर मोडल्याशिवाय ग्लाडसाहेब जेवणाच्या टिफिनला हात लावीत नसे. 

फाशीच कोणी कैदी तुरुंगात आला की ग्लाडसाहेबांना कोणी शत्रू तावडीत सापडल्याचा आनंद होई. गुन्हेगारांना फाशी चढवताना एखादे धार्मिक कृत्य केल्याचे सात्विक तेज चेहऱ्यावर झळकायचं. आज तर त्यांच्या तावडीत राजद्रोही नक्षलवादी क्रांतिकारक सापडला होता. बुटाचा सोल फाटून निघेपर्यंत त्या नक्षलवाद्याला तुडवून काढल्याशिवाय ग्लाडसाहेबांना झोप आली नसती. 

जेमतेम तिशीचा, टपोऱ्या डोळ्याचा एक सावळसा तरुण एका हातात मायकोवस्कीच्या कवितांचे पुस्तक आणि दुसऱ्या हातात सिगरेट घेऊन आरामात बसला होता. चेहऱ्यावरचं कुत्सित हास्य सगळ्यांनाच खिजवत होतं. ग्लाडसाहेब रागाने भडकला, "भडव्या, फाशी झाली तरी अजून गांडमस्ती जिरली नाही का तूझी? "
" फाशीच्या किरकोळ दोरखंडाने जिरणारी मस्ती आम्ही करीत नाही मिस्टर ग्लाड, आमची मस्ती फार मोठी आहे. तुमच्यासारखी खाकी कपड्याने आलेली नाहीय ती, " एका ध्येयाने प्रेरीत होऊन जीवावर उदार झालेल्या त्या कैद्याने दिलेलं उत्तर ऐकून सगळेच चकीत झाले. 

इथून सुरु होतो एक छुपे युध्द, कैदी नंबर आठसौ बयालीस, नाम वीरभुषण पटनाईक, वय अंदाजे तीस विरुद्ध जेलर ग्लाड. तारुण्यात जर्मन गेस्टाॅपोंचा छळ सहन केलेला. त्याची बायको छळछावणीत गेली ती गेलीच. मग तान्ह्या मुलीला घेऊन भारतात आलेला इंग्रज राजवटीत जेलर बनलेल्या ग्लाडसाहेबांची जेवढी निष्ठा फिरंग्याला होती तेवढीच आता तिरंग्यालाही होती. 

वीरभुषण पटनाईक हा फाशीची शिक्षा ठोठवलेला, शिक्षेच्या अंमलबजावणीची शांतपणे वाट बघणारा एकमेव कैदी होता ज्याला तीन महिन्यात ग्लाडसाहेबांना तुडवता आलं नव्हतं. व्यवस्थित खात पीत होता. शांत झोपत होता. शिवाय वजनही चार किलो वाढलं होतं. नेहमी कवीता गुणगुणत असायचा. ग्लाडसाहेब राऊंडला आला की हसतमुखाने विचारायचा, " हॅलो मिस्टर ग्लाड, हाऊ आर यू..? "
ग्लाडसाहेबांना उत्तर द्यायला सुचायचं नाही. 

ग्लाडसाहेबांची गरोदर मुलगी बाळंतपणासाठी आली होती. तिला या कैद्याबद्दल ऐकून नवल वाटलं. त्याला भेटल्यावर, त्याच्या कविता ऐकल्यावर म्हणाली, माझ्या पोटी जन्माला येशील का परत.... 

फाशीचा दिवस जवळ येत होता. ग्लाडसाहेबांनी दयेचा अर्ज लिहायला सांगूनही त्याने नकार दिला होता. क्रांतिकारकाने केलेला दयेचा अर्ज हा क्रांतीचा अपमान आहे असं तो समजत होता. स्वत:च्या अपमानाने चिडलेल्या ग्लाडसाहेबांनी त्याला तुडवून काढलं तो बेशुद्ध पडेपर्यंत. 

त्यानंतर त्याच्या फाशीची तयारी सुरु झाली. त्या रात्री जोरदार वादळ सुरु झालं. पावसाने रस्ते बंद झाले. त्याच वेळी. ग्लाडसाहेबांच्या मुलीच्या पोटात कळा येऊ लागल्या. तैनातीत असलेल्या नर्सने ग्लाडसाहेबांना सांगीतलं ताबडतोब सिझेरियन नाही केलं तर मुलीच्या जीवाला धोका होईल. जेल चा डाॅक्टर सुटीवर गेलेला. मुलीच्या काळजीने धास्तावलेल्या ग्लाडसाहेबांना नर्स आठवण करून देते की, पहाटे फासावर जाणारा कैदी नंबर आठसौ बयालीस डाॅक्टर आहे, सर्जन आहे. ते ऐकून बाहेरचं वादळ जणू ग्लाडसाहेबांच्या डोक्यात थैमान घालू लागतं. 

उन्मत्त राजसत्तेच्या प्रतिनिधी ग्लाडसाहेब आणि त्रस्त जनतेचा प्रतिनिधी म्हणून वीरभुषण पटनाईक या दोन परस्पर विरोधी व्यक्तिमत्वांचा संघर्ष इतका जबरदस्त आहे की थक्क व्हायला होतं. पण ह्यात कोणाचेही उदात्तीकरणकरण न करता लेखकाने स्विकारलेला तटस्थपणा जास्त परिणामकारक ठरतो, ही कादंबरी जरी पन्नास वर्षांपूर्वी प्रकाशित झालेली असली तरी आजही यातला संघर्ष समयोचित, तितकाच कालसुसंगत वाटतो. काही कहाण्या कधीही जुन्या होत नाही. ही कादंबरी त्यापैकी एक आहे. 









Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.