वसंत गोवारीकर
( २५ मार्च १९३३ - २ जानेवारी २०१५ ) भारतातल्या प्रत्येक माणसाला वैज्ञानिक दृष्टिकोन असला पाहिजे, असे विचार या द्रष्ट्या शास्त्रज्ञाच्या मनात सतत रुंजी घालत होते. त्या विचारांतून त्यांना देशभरात एक वैज्ञानिक चळवळ रुजवण्याची कल्पना सुचली. त्यासाठी त्यांनी २८ फेब्रुवारी हा दिवस ‘विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जावा असे आवाहन केले. त्यानुसार भारतात १९८७ सालापासून ही प्रथा अमलात आली आहे. दरवर्षी एखादी मध्यवर्ती वैज्ञानिक संकल्पना घेऊन देशभरातल्या गावागावांतून विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. सर्व वयोगटांतल्या लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, वाढावा या दृष्टीने अनेकविध कार्यक्रम राबवले जातात. त्यांमध्ये पथनाट्ये, व्याख्याने, प्रयोग मेळावे, विविध विषयांवरील कृतिसत्रे, सहली, अशा प्रकारच्या कार्यक्रमांचा अंतर्भाव असतो.
त्यांनी सुरू केलेला आणखी एक अत्यंत कल्पक, देशव्यापी कार्यक्रम म्हणजे राष्ट्रीय बालविज्ञान काँग्रेस! शालेय शिक्षण घेणाऱ्या तमाम भारतीय बालवैज्ञानिकांसाठी हा कार्यक्रम म्हणजे एक आनंदाची आणि ज्ञान संपादन करण्यासाठीची मोठी पर्वणीच असते. २००५ साली त्यांच्या प्रमुख संपादकपदाच्या नेतृत्वाखाली ‘द फर्टिलायझर एनसायक्लोपीडिया’ या प्रचंड ग्रंथाचे काम पुरे झाले. त्यांचे २०० हून अधिक विज्ञानविषयक शोधनिबंध, अनेक विज्ञान पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांचे हे लेख आणि पुस्तके अनेक विद्यापीठांच्या आणि बोर्डांच्या पाठ्यपुस्तकांमधून अभ्यासासाठी लावले गेले आहेत. ‘द अॅस्ट्रोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेतर्फे २००४ साली अग्निबाणाच्या तंत्रज्ञानाच्या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल त्यांना ‘आर्यभट्ट’ हा अत्यंत मानाचा पुरस्कार मिळाला. त्यांना अनेक संस्थांची सुवर्णपदके, मानाच्या पदव्या, तसेच पद्मश्री आणि पद्मभूषण हे पुरस्कार मिळालेले आहेत.