(२६ मार्च १९०९ – २७ नोव्हेंबर २०००)
संपादक, अनुवादक, सृजनशील साहित्यिक, संशोधक, ग्रंथालयशास्त्राचे तज्ज्ञ आणि प्रकाशक म्हणून मराठी साहित्यजगताला ज्ञात असलेले गोव्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक.आज मुक्त चांदणे ही गोवा मुक्तिसंग्राम वर आधारलेली दोन भागांतील कादंबरी.१९४६ ते १९६१ या गोवामुक्ती कालखंडातील महत्त्वपूर्ण घटना, त्यात गुंतलेल्या माणसांच्या मनातील भावनांदोलनांचे प्रभावी चित्रण सातोस्करांनी केले आहे.रामायण आणि महाभारत हे त्यांच्या अखंड चिंतनाचे विषय. श्रीरामाच्या जीवनावर आधारित अभिराम ही कादंबरी तर श्रीकृष्णावर वासुदेव ही कादंबरी लिहिली. पर्ल बक यांच्या गुड अर्थचे धरित्री नावाने भाषांतर केले. चार्ल्स डिकन्सच्या ऑलिव्हर ट्विस्टचा दिग्या या नावाने त्यांनी अनुवाद केला. या त्यांच्या सुरूवातीच्या अनुवादित कादंबऱ्या. मराठी कादंबरीचे अनुभवक्षेत्र वाढविण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.प्रीतीची रीत आणि अभुक्ता हे त्यांचे दोन कथासंग्रह. द्राक्षांचे घोस आणि पंचविशीतले पाप हे त्यांचे अनुवादित कथासंग्रह. वि. स. सुखटणकर यांच्या सह्याद्रीच्या पायथ्याशी या प्रादेशिक कथासंग्रहापासून प्रेरणा घेऊन कुळागर हा बारा कथाकारांच्या प्रादेशिक कथांचा संग्रह १९३७ मध्ये त्यांनी संपादित केला.
उदंड जाहले पाणी हे सातोस्करांनी एकमेव नाटक लिहिले. गोमंतकीय मराठी साहित्याचे शिल्पकार आणि गोमंतकीय मराठी साहित्याचे आधुनिक शिल्पकार हे त्यांचे दोन महत्त्वाचे समीक्षात्मक ग्रंथ.त्यांच्य गोमंतक : प्रकृती आणि संस्कृती या ग्रंथाच्या दुसऱ्या खंडाला ‘केसरी-मराठा ट्रस्ट’चा न. चिं. केळकर पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. १९८२ साली भरलेल्या १७ व्या अ. गो. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद त्यांनी भूषविले
( संदर्भ - मराठी विश्वकोश)